यावल तालुक्यात बालविवाह रोखला; मानापानावरुन भावानेच केली तक्रार.

0
12

यावल प्रतिनिधि अमीर पटेल

यावल -लग्न समारंभ म्हटले की,मानपान नातेवाईकांचे रुसवे-फुगवे आणि प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होतोच. अनेकदा अशा काही कारणावरुन वादही उद्भवतात. मात्र,यावल तालुक्यातील साकळी येथे लग्नात मावस भावाला मान मिळाला नाही.या रागातून संबंधित व्यक्तीने बालविवाह होत असल्याची माहिती बालविकास प्रकल्पाच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे तात्काळ अर्ज पाठविल्याने बालविवाह रोखण्यात आला आल्याची घटना यावल तालुक्यात घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज23 मे रोजी यावल तालुक्यातील साकळी येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गोपाळ ज्ञानेश्वर आढाळे (वय 27) याचा विवाह होत असताना. मात्र नवरीचा मावसभाऊ रविंद्र शालिक सोनवणे यांनी यावल येथे महिला व बालविकास प्रकल्पाच्या प्रभारी अधिकारी अर्चना आटोले यांच्याकडे या बालविवाह संदर्भात अर्ज दिला. या अर्जाची तात्काळ दखल घेत कत्पना तायडे व मंगला नेवे यांनी साकळी येथील भवानी माता मंदीर हॉल येथे लग्नस्थळी जावुन हा होणारा बालविवाह थांबविला.
महिला व बालविकास प्रभारी अधिकारी अर्चना आटोले, पर्यवेक्षिका कल्पना तायडे व साकळी अंगवाडीच्या सेविका मंगला नेवे यांच्या मदतीने यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांनी हा विवाह थांबविला.लग्न लावणाऱ्या दोघांकडील मंडळीला पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले.यावेळी महिला बालविकास अधिकारी अर्चना आटोले यांच्या मध्यस्थीने मुलगी ही अल्पवयीन असल्याने सदरचा विवाह लावता येणार नाही,तसे झाल्यास आपल्या विरूद्ध गुन्हे दाखल होतील,अशी माहिती वधु वराच्या मंडळींना पोलिसांकडून मिळाली. अखेर हा अल्पवयीन मुलीचा विवाह थांबला.या संदर्भात पोलीसांनी वधु आणि वर मडंळीचे जाब जबाब घेतल्याने दोघ लग्न लावणारी मंडळी ही आपआपल्या गावी घरी निघुन गेली.

Spread the love