यावल अमीर पटेल
यावल– नगरपरिषद हद्दीत विकसित भागात भास्करनगर, गुरुदत्तनगर,गणेशनगर भागात नगरपरिषदे मार्फत जे एसटीबीटी रोड बांधकाम करण्यात आले त्या बांधकामाच्या इस्टिमेट मध्ये पॅराफीट वॉलसह 9 मेट्रिक टन आसारी आणि गटार बांधकाम करताना आजूबाजूला प्लस्टर करणे नमूद असताना इस्टिमेट प्रमाणे काम न करता सोयीनुसार कागदावर रस्ते तयार करण्यात आले तसेच नगरपरिषदेचे प्रमाणपत्र बघितले असता त्यावर जा.क्र.दिनांक नसल्याचा प्रताप माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती नुसार उघडकीस आला आहे.
यावल येथील राजेश कडू महाजन यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दि.20 मे 2022 रोजी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, नगरपरिषद हद्दीत नवीन वसाहतीत जे डांबरी रस्ते व गटारी झाले आहेत ते इस्टिमेट नुसार झालेले नसून निकृष्ट दर्जाचे झाले आहे या कामांमध्ये नगरपरिषदेने दिलेल्या नियमाचे उल्लंघन करण्यात झाले म्हणून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून ठेकेदार व अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
नियमानुसार काम सुरू करण्याच्या अगोदर कामाच्या ठिकाणी दर्शनी भागावर कामाचा तपशील असलेला फलक लावणे आवश्यक आहे,ज्या रस्त्याचे काम घेतले आहे ते रस्ते व्यवस्थितरीत्या खोदून साफसफाई करून रस्त्यावरील पाणी दोघेही बाजूंनी शेजारील गटारी मध्ये जाईल अशी व्यवस्था करून व रस्त्यामध्ये डबर टाकून रोलिंग करणे आवश्यक असते,त्याचप्रमाणे रस्त्याच्या कामासाठी लागणारे दगड हे 70% मोठे डबर आणून हाताने फोडून त्याचे साधारण दोन ते अडीच इंच एवढे छोटे तुकडे करून ते रस्त्यासाठी वापरणे व उरलेले 30 टक्के दगड हे क्रशर मशीनने फोडून वापरणे व साधारण दोन किलो डांबर पर स्क्वेअर मीटर पसरविणे आवश्यक असते,रस्त्याची फिटनेस ही 75 एमएम व 20 एमएम सीलकोड करणे आवश्यक आहे.
रस्त्याचे इस्टिमेट मध्ये वेगवेगळ्या आकाराची म्हणजे 8,10,12,26 निरनिराळ्या डायमीटर ची आसारी वापरलेली असून ती फाउंडेशन बिम कमानी व इतर अशा ठिकाणी साधारण 8 हजार 976 किलो जवळजवळ 9 मेट्रिक टन एवढी आसारी इस्टिमेट मध्ये दाखवलेली आहे,आसारी व वरील प्रमाणे ऍटम हे डांबरी रस्ते गटारी साठी वापरतात का? कामाचे इस्टिमेट हें अपाचे आर्थिक नुकसान करणारे आहे या कामांमध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे सदर कामाची वर्कऑर्डर दि.17/12/ 2021ला देण्यात आली आणि दि.27/1/2022 ला कामाचे बिल साधारण 45 लाख रुपये देण्यात आले हे बिल साधारण 40 दिवसांमध्ये अदा करण्यात आले या कामाचे इस्टिमेट हे 60 लाख रुपयाचे आहे. रस्त्यांच्या कामांमध्ये शासनाच्या पैशाची लूट झाल्याचे दिसून येत आहे,तसेच या प्रकरणा संदर्भात माहिती अधिकारात मिळालेली माहिती प्रत्यक्ष बघितली असता यावल नगरपरिषदे तर्फे जे प्रमाणपत्र जोडण्यात आले आहेत या प्रमाणपत्रावर यावल नगरपरिषद कार्यालयातील जावक क्रमांक आणि दिनांक नसल्याने संबंधितांनी मद्यपान करून बिल अदा केले आहे का?असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात आहे, म्हणून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजेश कडू महाजन यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.