तर शिवसेनेच्या आमदारांनी भाजपाला मतदान केलं असतं, नवनीत राणा यांचा खळबळजनक दावा

0
16

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांनी हनुमान चालीसा पठण करण्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेला घेरलं होतं. आता राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज्यसभेचं मतदान गुप्त पद्धतीने झालं असतं तर शिवसेनेच्या बहुतांशी आमदारांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं असतं, असा खळबळजनक दावा राणा यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. आमदार रवी राणा यांनी काल मतदान केल्यानंतर हनुमान चालीसा दाखवत धार्मिक प्रदर्शन केलं होतं. त्यावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, “हनुमान चालीसा वाचणं ही आमची आस्था आहे. आम्ही जेव्हा चांगल्या कामासाठी घराबाहेर पडतो, तेव्हा मंदिरात जाऊन आराधना करतो. त्याचप्रमाणे रवी राणा यांनी देखील केलं आहे.” त्यांना हनुमान चालीसाचा एवढा विरोध का आहे? असा सवालही नवनीत राणा यांनी यावेळी विचारला.

हनुमान चालीसाचा विरोध करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जनतेची कामं केली पाहिजेत. जनतेमध्ये राहिले तर काहीतरी फायदा होईल. आता रडण्यात काहीही अर्थ नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. आज शिवसेना सत्तेत असून देखील त्यांना आपला उमेदवार निवडून आणता आला नाही, याचा अर्थ ते खूप मोठे अपयशी आहेत, असंही त्या म्हणाल्या.

भाजपानं घोडेबाजार केल्याच्या आरोपाबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, हे गुप्त मतदान असतं तर बहुतांशी शिवसेनेच्या आमदारांनी भाजपाला मतदान केलं असतं. हे मतपत्रिका दाखवून मतदान करायचं होतं. तरीही देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी सहावी जागा निवडून आणली. हे मतदान गुप्त पद्धतीने झालं असतं तर बॉम्बस्फोटचं झाला असता, असा दावाही त्यांनी केला.

Spread the love