आनंद दिघे बाळासाहेबांचे खरे हनुमंत, पळून गेलेले भजनलाल आहेत. संजय राऊत

0
14

मुंबई: ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण अधिकच तापताना दिसत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिवसेनेसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत.

यातच आता एकनाथ शिंदे नवीन गटाची स्थापना करणार असून, शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट असे नाव देणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, शिवसेनेकडून याला आक्षेप घेण्यात आला आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कुणीही वापरू नये, यासाठी शिवसेना राज्य तसेच केंद्रीय आयोगाला पत्र पाठवणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक बैठकही शिवसेना भवनावर पार पडली. यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा चांगलेच सुनावले आहे.

आनंद दिघे बाळासाहेबांचे खरे हनुमंत

एकनाथ शिंदे यांनाच खरे मुख्यमंत्री करायचे असे उद्धव ठाकरे यांच्या मनात होते. मात्र, भाजपने त्याला आक्षेप घेतल्यामुळे ते झाले नाही, असा दावा करत, एकनाथ शिंदे हे वारंवार बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे नाव घेत आहेत. या दोघांचेही नाव त्यांनी घेऊ नये. आनंद दिघे हे तर बाळासाहेबांचे खरे हनुमंत होते, असे म्हटले आहे. तसेच शिवसेनेतून आतापर्यंत अनेक जण सोडून गेले. अनेक बंड शिवसेनेने याआधीही पाहिले आहेत. मात्र, त्याने पक्षाला काहीही फरक पडत नाही. कारण, शिवसेना हा तळागाळापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे आणि तो मजबूत आहे. काही वर्षांपूर्वी भजनलाल हे काँग्रेसमधून बंडखोरी करून अनेक आमदार आपल्यासोबत घेऊन गेले होते. पक्षाला त्याने काही फरक पडला का, असे सांगत गुवाहाटीला गेलेले शिवसेनेचे बंडखोर भजनलाल असल्याचा टोला लगावला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शरद पवार राजकारणातील भीष्म पितामह

शरद पवार हे राजकारणातील भीष्म पितामह आहेत. ते एक ज्येष्ठ आणि अतिशय अनुभवी नेते आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर ते स्वतः मैदानात उतरले होते. त्यांनी प्रत्येक आमदाराला पुन्हा आणले होते. त्यावेळेस आम्हीही अगदी पुढे होऊन त्यांना मदत करत होतो. त्यात एकनाथ शिंदेही होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारबाबत किंवा अन्य मुद्द्यांबाबत आम्ही कायम त्यांचा सल्ला घेत असतो, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यामागे त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे आताही राष्ट्रवादीचे नेते आणि खुद्द शरद पवार हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, बंडखोर आमदार भाजपचे बंदी आहेत, कैदी आहेत. या आमदारांना भाजपकडून स्क्रीप्ट दिली जात आहे. दीपक केसरकर हे गृहराज्यमंत्री होते, कोकणतील नेते आहेत. फार बेडर माणूस आहे, असे मी ऐकले. पण, रात्रीत पळून गेले ढुं* पाय लावून, असे म्हणत संजय राऊत यांनी केसरकरांवर निशाणा साधला. तसेच, केसरकर कोण?, माझे अन् त्यांचा कधी जास्त संवाद झाला नाही. ते पक्षात आहेत, मी त्यांचा आदर करतो. ते सावंतवाडीतून निवडून आलेत, ग्रामीण भागातून येतात. शरद पवारांचे अत्यंत्य निष्ठावंत होते. मग, आमच्याकडे आले, उद्धव ठाकरेंनी त्यांना पहिल्याच टर्ममध्ये त्यांना गृहराज्यमंत्री केले. तरीही ते गेले, असे म्हणत राऊत यांनी पुन्हा शिंदे गटावर हल्लाबोल केला.

Spread the love