विश्लेषण : देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री का बनले? भाजपाच्या मास्टर प्लॅनमागची ५ मोठी कारणे

0
13

मुंबई  –  गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले होते. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केले आणि ते आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतर शिंदे गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढत भाजपासोबत युती केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. परिणामी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. शिवसेनेचे बंडखोर आमदार भाजपाला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र, ऐनवेळी भाजपाने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचे नाव पुढे केले आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

गुरुवारी संध्याकाळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, असे जाहीर केले. तसेच उर्वरीत मंत्रिमंडळाची स्थापनाही लवकरच करण्यात येईल असेही फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदेच्या शपथविधीच्या अवघ्या एका तासापूर्वी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पक्षश्रेष्ठींकडून फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री का केले? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत आहे. यामागे ५ मोठी कारणे आहेत. ज्यामुळे भाजपने हे पाऊल उचलले आहे. भाजपचे हे पाऊल आगामी काळात त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

कारण १

२०१९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपा आणि शिवसेनेने युतीने लढवली आणि जिंकली. मात्र, निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार, या प्रश्नावर युती तुटली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, राष्ट्रवादीने या जोडीला पाठिंबा दर्शवला नाही आणि बहुमत नसल्यामुळे फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागेल. त्यानंतर राष्ट्रवादी, काग्रेस आणि शिवसेनेची युती झाली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री.

मात्र, शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर भाजपाने लगबगीने अजित पवारांशी युती करत सत्ता स्थापन केली. या खेळीनंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. भाजपाला सत्तेची हाव सुटली आहे, भाजपा सत्तेचा लोभ असलेला पक्ष आहे, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर भाजपची प्रतिमा सुधारेल आणि भाजपला सत्तेची हाव असल्याचा आरोप कोणीही करु शकणार नाही, असा विचार करून हे पाऊल उचलले गेल्याची शक्यता आहे.

कारण २

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप. केला होता. ‘तुम्ही (भाजपाने) बाळासाहेबांच्या मुलाला खाली ओढले, असे म्हणत उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेकडून सहानभूती मिळत होती. भाजपाने बाळासाहेबांच्या मुलाला सत्तेवरून खाली खेचण्याचा कट रचला असल्याच्या भावना जनतेमध्ये जागृत होत होत्या. मात्र, भाजपने येथेही मास्टर स्ट्रोक खेळत एका ‘शिवसैनिक’ला मुख्यमंत्री केले. त्यामुळे सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरही सत्ता एका शिवसैनिकाकजे राहणार असल्यामुळे उद्धव ठाकरेंचे हे आरोप फोल ठरले.

कारण 3

भाजपाला बाळासाहेबांसारखेच विचार करणाऱ्या एका शिवसैनिकाच्या हातात सत्तेची सूत्र दयायची होती. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून त्यांनी हे कामही अगदी सहज केले. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी घोषणा करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर ‘शिवसैनिक’ बसल्याने बाळासाहेबांचे स्वप्न आजही पूर्ण होत असल्याचे फडणवीस म्हणाले होते.

कारण ४

२१ जूनपासून महाराष्ट्रात झालेल्या राजकीय गोंधळानंतर महाराष्ट्रात खरी शिवसेना कोण, असा प्रश्न निर्माण झाला होता. हा प्रश्न काही काळ अनुत्तरीत राहणार असला तरी आगामी काळात बाळासाहेबांचा वारसा पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. शिंदे मुख्यमंत्री असल्याने २०२४ च्या निवडणुकीमध्ये खऱ्या शिवसेना पक्षासोबत असल्याचा दावा करणे भाजपला सोपे जाईल.

कारण ५

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या निर्णयामुळे शिवसेनेत निर्माण झालेला एकनाथ शिंदे गट आणखी मजबूत करण्याचे काम भाजपने केले आहे. आता एकनाथ शिंदे सहजपणे शिवसेना पक्षाला आपल्या ताब्यात घेऊ शकतात, त्यांचा पुढचा टप्पाही हा असू शकतो. अशा स्थितीत महाराष्ट्रातील मराठा मतदारांपर्यंत पोहोचण्याचाही भाजपचा प्रयत्न असेल. शिवसेनेशिवाय भाजपा निवडणुकीत उतरला असती तर मराठा मतांव्यतिरिक्त हिंदुत्वाच्या मतांचे नुकसान झाले असते.

एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद देण्यामागे भाजपाचे हे विचार असल्याची शक्यता आहे. मात्र, आता मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर भाजपाच्या पाठिंब्याने शिंदे कसा कारभार चालवतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Spread the love