ठाण्यातील शिवसेना शाखांवर शिंदे गटाचा डोळा?

0
15

ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे मुख्य केंद्र असलेले टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ताबा मिळविला असतानाच, त्यापाठोपाठ आता शहरातील शिवसेनेच्या शाखाही ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाने प्रयत्न सुरु केले आहेत. शिंदे गटाचे कार्यकर्ते शाखांमध्ये जाऊन त्यांना शिंदे गटात सामील होण्यास सांगत असून त्यास काही जणांकडून नकार दिला जात असल्याने दोन्ही गटात वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शाखा कुणाच्या असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या महापालिकांसह नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये आजवर शिवसेनेची सत्ता राहीली आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याची कमान हाती घेतली. त्यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्याबरोबरच त्यांनी स्वतचा दबदबा निर्माण केला. यामुळेच बंडखोरीनंतर त्यांना जिल्ह्यातून मोठे समर्थन मिळताना दिसत आहे.

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखापासून ते पालिकांमधील नगरसेवकांनी उघडपणे त्यांचे समर्थन केले आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख केंद्र असलेले टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम हे कुणाच्या ताब्यात राहील याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. मात्र, शिंदे गटांनी याच परिसरात मोठे शक्तीप्रदर्शन करत आनंद आश्रमात प्रवेश केल्याचे दिसून आले होते. तसेच या आश्रमाच्या ट्रस्टवर असलेले माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, हेमंत पवार यांच्यासह इतर सर्वचजण शिंदे गटात सामील झाले असून त्यांनी बॅनर लावून उघडपणे जाहीर केले आहे.

नगरसेवकांमुळेच आपल्यावर आजवर अन्याय झाल्याची शाखाप्रमुखांमध्ये भावना –

या आश्रमावर ताबा मिळविल्यानंतर शिंदे गटाने आता शहरातील शाखांकडे मोर्चा वळविला आहे. शिंदे गटाचे सक्रीय कार्यकर्ते शहरातील शाखांमध्ये जात आहेत. अनेक शाखांमधील शाखाप्रमुखांनी तसेच कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नसून अशा शाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांना शिंदे गटात सामील होण्यास सांगण्यात येत आहे. त्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोन गटात वाद होऊ लागल्याचे चित्र आहे. शिंदे यांनी अद्याप शिवसेना सोडलेली नसून त्यांचे समर्थन करावे असे शिंदे यांच्या गटाकडून शाखाप्रमुखांना सांगण्यात येत आहे. मात्र, काही शाखाप्रमुखांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नसून यामुळे शिंदे गटांनी अशा शाखाप्रमुखांना आपल्या गटात खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. प्रभागातील प्रस्थापित नगरसेवकांमुळे अनेक शाखाप्रमुखांना नगरसेवकाची उमेदवारी मिळू शकलेली नसून नगरसेवकांमुळेच आपल्यावर आजवर अन्याय झाल्याची भावना अनेक शाखाप्रमुखांमध्ये आहे.

शाखांवरून वाद –

ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच चंदनवाडी येथील शाखेजवळ पोस्टवरून वाद झाला होता. याठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाथ लावण्यात आलेल्या पोस्टरमधील मजकुरावर शाई फासण्यात आली होती. यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यापाठोपाठ दोन दिवसांपुर्वी लोकमान्यनगर भागात शिंदे गटाचे कार्यकर्ते शाखेत गेले होते. त्यांनी तेथील शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात सामील होण्यास सांगितले. मात्र शाखाप्रमुखासह पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात सामील होण्यास नकार देत उद्धव ठाकरे यांच्याच गटात असल्याचे स्पष्ट केले. त्यावरून दोन्ही गटात वाद झाला. काही वेळाने दोन्ही गटाचे पदाधिकारी तिथे पोहचले आणि त्यांनी आपसात बसून वाद मिटविला.

तर त्या गटाकडे शाखा जातील –

शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांनी काही वर्षांपुर्वी बंडखोरी करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळेस वागळेतील जय महाराष्ट्र नगरमधील एक शाखा ताब्यात घेण्यावरून शिवसैनिकांसोबत त्यांचा वाद झाला होता. या वादादरम्यान दगडफेकही झाली होती. या प्रकरणानंतर ठाण्यातील शाखांची मालमत्ता पदाधिकाऱ्यांच्या नावावर असल्याचे समोर आले होते. त्यावेळेस सर्वच शाखांची मालमत्ता शिवसेनेच्या नावावर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र तसे काहीच झालेले नसून ठाण्यातील शाखांची मालमत्ता पदाधिकाऱ्यांच्या नावावर आहे. त्यामुळे हे पदाधिकारी ज्या ठिकाणी जातील, त्या गटाकडे शाखांचे ताबा जाईल, अशी शक्यता वर्तवीली जात आहे.

Spread the love