ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार शिक्षण जिल्हा परिषदेचा व्ही-स्कुल प्रकल्पाचा शुभारंभ

0
35

जळगाव -जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काळाची पावले ओळखून जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सुरु केलेला ऑनलाईन व्ही-स्कुल प्रकल्प कौतुकास्पद असल्याचे गौरोवोद्वार राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी काढले.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरु केलेल्या ऑनलाईन व्ही-स्कुल प्रकल्पाचे उद्घाटन आज पालकमंत्री ना.पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, श्री.अकलाडे आदि उपस्थित होते. चांगले उपक्रम राबविण्यासाठी जळगाव जिल्हा नेहमीच आघाडीवर असतो. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा व्ही-स्कुल हा उपक्रम याचेच उदाहरण आहे. लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षण पध्दती गरजेची झाली आहे. याचबरोबर भविष्यात ऑनलाईन शिक्षणाला महत्व प्राप्त होणार असल्याने या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण मिळणार आहे. व्ही-स्कुल प्रकल्प स्थानिक बोली भाषेत उपलब्ध करुन देण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली.ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या. अशावेळी विद्यार्थ्यांची शिक्षणाची गरज ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे पूर्ण होण्यास मदत झाली आहे. लवकरच शाळा ऑफलाईन सुरु होणार असल्या तरी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. या प्रकल्पाची माहिती शिक्षणाधिकारी श्री.अकलाडे यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love