शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाची ‘मशाल’ धगधगणार! आयोगाचे नाव-चिन्हावर शिक्कामोर्तब

0
12

शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा तसेच शिवसेना हे नाव न वापरण्याचा हंगामी निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दिला. त्यानंतर शिवसेनेकडून तीन चिन्ह आणि तीन नावे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली होती. त्यावर आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. शिवसेनेला ‘मशाल’ हे चिन्ह आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आले आहे.

शिवसेनेने त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल ही तीन चिन्ह आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावे निवडणूक आयोगाकडे पाठवली होती. त्यापैकी मशाल हे चिन्ह आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे.

‘त्रिशूळ’ हे धार्मिक चिन्ह आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार हे चिन्ह राजकीय पक्षाला देता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले. तर ‘उगवता सूर्य’ हे चिन्ह डीएमकेचे निवडणूक चिन्ह आहे. ते एका राजकीय पक्षाचे वापरातील चिन्ह असल्याने निवडणूक आयोगाने ‘उगवता सूर्य’ हे चिन्ह अमान्य केलं आहे.

Spread the love