ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ असलेल्या सुषमा अंधारे यांचे त्यांच्यापासून विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. अंधारेंसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. कारण वाघमारेंच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे अंधारे यांच्या आक्रमकतेवर गदा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुषमा अंधारे या आक्रमक नेत्या आहेत. ठाकरे गटाने त्यांना पक्षाचं उपनेतेपद दिलं. त्यांनीही या संधीचं सोनं करत अल्पावधीतच पक्षात आणि राज्यात आपली छाप उमटवली. शिंदे गट अंधारे यांच्या रडारवर आहे. त्या शिंदे गटावर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे अंधारेंना रोखण्यासाठी शिंदे गटाने नवी खेळी खेळली आहे.
शिंदे गटाकडून ठाण्यात आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. तिथेच वैजनाथ वाघमारे अडसरकर आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. सुषमा अंधारे यांना बॅकफूटवर आणण्यासाठी ही शिंदे गटाची ही खेळी आहे. वाघमारे यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्यावर त्यांना पक्षाची मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यामुळे अंधारेंची आक्रमकता कमी होऊ शकते की अधिक आक्रमक होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.