मुंबई : महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दृष्टीने शोध घेण्याचं काम सुरु असल्याचीही माहिती दिली. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्याबाबतच्या माहितीला दुजोरा दिला. राज्याच्या भूगर्भात कोळसा, बॉक्साईट, आर्यन या खनिजांसोबत सोनंही असू शकतं, असं आता बोललं जातंय. याबाबत केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याचंही सांगितलं जातंय. या दृष्टीने आता चाचणीही सुरु करण्यात आल्याचं कळतंय.
महाराष्ट्रात सोन्याचे दोन ब्लॉक आहेत, अशी माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हे सोनं निघालं तर ती महाराष्ट्रासाठी मोठी उपलब्धी असेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. सोन्याचे हे दोन ब्लॉक विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणतील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात असल्याचंही सांगितलं जातंय.
राज्याच्या भूगर्भात जर खनिजांचा साठा आढळून आला तर देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरु केला जाऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी राज्यातील सोन्याच्या खाणींबाबात केलेला उल्लेख सगळ्यांचं लक्ष वेधणारा ठरला.मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादा भुसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.