सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – येथून जवळच असलेल्या गोंभी शिवारात बिबट्या वारंवार दिसत असल्याने या परिसरात शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत या बाबत ‘ दै देशदूत ‘ ने या बाबत बातमी प्रसिद्ध केली होती.त्याची दखल घेत वनविभागाच्या कुऱ्हा पानाचे येथील कार्यालयाचे पुर्व विभागाचे वनअधिकारी विलास काळे , पश्चिम विभागाचे संदिप चौधरी ,वनसेवक नरेंद्र काळे , तुषार भोळे , विलास पाटील यांनी गोंभी शिवारातील गोंभी – वांजोळा रस्त्यावर असलेल्या गवताच्या शेतात जाऊन पाहणी केली यावेळी सुनसगाव सरपंच दिपक सावकारे , रविंद्र पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश सपकाळे , पत्रकार जितेंद्र काटे, व गोंभी येथील गोविंदा पाटील , संदिप कोळी , युवराज पाटील ज्या ग्रामस्थांनी प्रत्यक्ष बिबट्या पाहिला ते ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या बाबत जनजागृती केली तसेच बिबट्या पासून संरक्षण करण्यासाठी माहिती दिली आणि ग्रामस्थांच्या मनातून भिती दूर करण्याचा प्रयत्न केला.यावेळी कुऱ्हा पानाचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी बिबट्याच्या धाकामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.विशेष म्हणजे या शिवारात सुनसगाव ,वांजोळा , साकेगाव येथील शेतकऱ्यांची शेती आहे व रात्री अपरात्री शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे पिकं वाचविण्यासाठी शेतात यावे लागते त्यामुळे शेती शिवारात येताना बॅटरी ,काठी , किंवा वाद्य वाजवत तसेच मोबाईल वर गाणे वाजवत तसेच आवाज करीत शेताकडे जावे असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.