दिपक नेवे
◾साकळी येथील वार्ड क्रं.पाच मध्ये बऱ्याच काही नागरी समस्या आहे.
ग्रा.पं.कार्यालयास प्राप्त झालेल्या व नागरिकांच्या हक्काच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून गावातील वार्ड पाच मध्ये नागरिकांच्या मुलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी लवकरात-लवकर विकास कामे सुरू करण्यात यावी जेणेकरून वार्डात विकासकामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना चांगल्यात चांगली सुविधा मिळेल व नागरी समस्या सुटतील. ग्रा.पं. कार्यालयामार्फत अधिकारी वर्गाकडून वार्डात पाहणी करण्यात येऊन कार्यालयाच्या नियोजनानुसारच विकासकामे केली जावी अशी मागणी ग्रा.पं.सदस्या सौ.निलिमा चंद्रकांत नेवे यांनी ग्रामपंचायत प्रशासनास दि.२१ रोजी दिलेल्या लेखी निवेदनाने केलेली आहे.
सदर निवेदनात म्हटल्या नुसार, वार्डात प्राधान्यक्रमाने खाली नुसार मुलभूत स्वरूपाचे कामे करणे नितांत गरजेचे आहे.यात वार्डात ज्या ठिकाणी सांडपाण्याच्या गटारांची दुरावस्था झालेली आहे.त्या ठिकाणच्या गटारीवर तसेच जेथे-जेथे शक्य आहे त्या ठिकाणी अंडरग्राऊंड (भूमिगत)गटारी तयार करणे तसेच भवानी पेठ भागातील श्री.विलासभाऊ पवार यांच्या घरापासून ते खाली उतरापर्यंत रस्ता अतिशय खराब व धोकेदायक बनलेला आहे तरी हा रस्ता प्राधान्याने त्वरित दुरुस्त करणे, वाणी गल्ली ते शिरसाडकडे जाणाऱ्या रस्त्यात महिला शौचालयाजवळील गटारीच्या सांडपाण्याची कायमस्वरूपी समस्या सोडविणेकरिता नवीन गटार बांधून त्यागटारीवर धापा टाकणे तसेच याच ठिकाणच्या महिला शौचालयाची दुरुस्ती करणे
व ठिकाणच्या महिला शौचालयाजवळील केरकचरा व घाणीची कायमस्वरूपी विल्हेवाट लावणे, वार्डातील कोळीवाडा भागात ज्या ठिकाणी पेव्हर ब्लॉकचे काम अपूर्ण आहे त्या ठिकाणी आपल्या नियोजनानुसार उर्वरित रस्त्याच्या पेव्हर ब्लॉकचे काम करणे,तसेच वार्डातील उर्वरित भागात (जसे श्री विठ्ठल मंदिर भागात व इतर अजून काही भागात) पेव्हर ब्लॉकचे कामे करणे व मुजुमदार चौकातील व्हॉल्वची गळती कायम स्वरूपी बंद करून या ठिकाणच्या परिसरात कशी स्वच्छता ठेवली जाईल त्यादृष्टीने कामे केली जावी सदर भागातून जाणारा रस्ता हा मुख्य वापराचा असल्याने या ठिकाणी रस्ता पक्का कॉंक्रिटीकरण करण्यात यावे त्याचप्रमाणे वार्डात अजून ज्या- ज्या ठिकाणी काही मूलभूत नागरी समस्या असतील त्या समस्या ग्रा.पं.च्या अधिकारी वर्गाकडून पाहणी करुन प्राधान्यक्रमाने सोडविणे गरजेचे आहे.
तरी माझ्या निवेदनावर नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही लवकरात- लवकर व्हावी व नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास कामे केली जावी अशी मागणी सौ.नेवे यांनी केलेली आहे.
दरम्यान ग्रा.पं. सदस्या सौ. नीलिमा नेवे यांचे सदर निवेदन दि.२३ रोजीच्या मासिक सभेमध्ये चर्चेसाठी ठेवण्यात आले व ग्रामपंचायतीस प्राप्त सर्वच निधी एकाच वार्डात खर्च करता येणार नाही ग्रा.पं.कडून सांगण्यात आले. तथापि माझ्या निवेदनात सांगण्याचा अर्थ असा की, वार्डात निवेदनानुसार व अजून बऱ्याच नागरी समस्या आहे तसेच निवेदनात म्हटल्याप्रमाणे ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनानुसारच ‘ त्या ‘ नागरिसमस्या सोडवल्या जाव्या असे माझे म्हणणे आहे व माझ्या वार्डाच्या वाट्याला जेवढा निधी येईल तेव्हढ्याच निधीत तसेच भविष्यात येणाऱ्या निधीतून टप्प्याटप्प्याने विकासकामे व्हावी अशी माझी मागणी आहे.असे सौ.नेवे यांनी सांगितले.