चोपडा – तालुक्यातील खेडीभोकरी – भोकर दरम्यान तापी नदीवर दरवर्षी हंगामी लाकडी पूल बनविण्याची मागणी होत असते. परंतु दोन वर्षांपासून येथे पाईप माती रेती मुरूम खडी टाकून कच्चा रस्ता बनविण्यात येतो. कारण येथे पक्का पूल मंजूर झालेला असुन ह्या पक्का पूलाचे बांधकाम पुढील पाच वर्षे होणार नाही, तोपर्यंत येथे हंगामी लाकडी पुलाएैवजी कच्चा रस्ताच बनवण्यात येईल असे दिसते. पर्यायाने या मार्गावरील बस सेवा मागील वर्षापासून बंद आहे. त्यामुळे चोपडा व जळगाव येथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना अतोनात हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. चोपड्याकडून खेडीभोकरी पर्यंत व जळगाव कडून भोकर पर्यंत बससेवा असल्याने या दोन्ही गावातील दोन कि.मी. चे अंतर तापीनदी पात्रातून चढ-उतर करून जावे लागते. बऱ्याचदा येथे खाजगी प्रवासी वाहतूक वेळेवर नसल्याने उन्हाळ्यात व लग्नसराईत प्रवाशांना आपल्या सोबतचे सामानासह लहानमुलं वयस्कर लोकांना आेढत ताणत घेऊन जावे लागते. ह्या मार्गावरील प्रवाशांची फरफट थांबविण्यासाठी जळगाव व चोपडा आगारातून बससेवा सुरू केली पाहिजे, अशी आग्रही मागणी गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.
एस.टी.ला सर्वाधिक उत्पन्न देणारा भोकर मार्ग
चोपडा व जळगाव आगारातून भोकरमार्गे दर एक तासाला बससेवा सुरू केल्यास एस.टी.ला सर्वाधिक उत्पन्न मिळणार आहे. यासाठी सा.बां.विभागाने प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून “रस्ता वापरण्यायोग्य आहे” असा अहवाल दिल्यास बससेवा सुरू होऊ शकते, असे एस.टी.विभागाचे म्हणणे आहे. कारण या मार्गावरून लहान मोठे प्रवासी वाहने व मालवाहू अवजड वाहने वापरत आहेत. म्हणुन सा.बां.विभागाने त्वरित बससेवा सुरू करणेस परवानगी द्यावी..
जगन्नाथ बाविस्कर (माजी संचालक – मार्केट कमेटी, चोपडा)