अंबरनाथ लोकल वाहतूक ठप्प झाली असतानाच एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंबरनाथ लोकल उभा राहिली असताना काही प्रवाशी लोकलमधून चालत ट्रॅकच्या बाजूने जात होते.
तेव्हा एका महिलेसोबत असलेल्या पुरुषाच्या हातात असलेले चार महिन्यांचे बाळ वाहत्या नाल्यात पडल्यानंतर वाहून गेले. यावेळी बाळाच्या आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. अखेर शोधाशोध केल्यानंतर ते बाळ झाडाच्या फांद्यामध्ये अडकलेले आढळून आले. देव तारी त्याला कोण मारी, असा चमत्कार घडत पुन्हा त्या बाळाची भेट आईशी झाली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज (दि.१९) दुपारी तीनच्या सुमारास अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकादरम्यान २ तास उभा होती. यावेळी काही प्रवासी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते.
त्यात एका लहान बाळाला घेऊन त्या बाळाची आई आणि एक व्यक्ती निघाले होते. तेव्हा त्यांच्या हातून चार महिन्यांचे बाळ निसटून नाल्यात पडले. पाण्याच्या वाहत्या प्रवाहासोबत बाळ वाहून गेले. त्या बाळाचा शोध घेण्यात आला. अथक परिश्रमानंतर ते बाळ एका झुडपांमध्ये अडकलेले दिसले. शोधकर्त्यांचे सर्वांनी आभार मानले, अशी माहिती निवासी जिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली.











