जळगाव – कोविड काळात औषध खरेदीसह अनेक विषयात कोट्यवधींच्या घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्यावेळच्या सिव्हील सर्जन यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले होते. या सगळ्याचे धागेदोरे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यापर्यंत पोहोचत असून यासंदर्भात शिंदे गटाचेच आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आमच्यावर आरोप करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी, चिमणराव पाटील यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करावी असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.
मुख्यमंत्र्यांची मांडी चेपलीय
दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा समाचार घेतला. ‘तुमच्या आजूबाजूचे जे मांडीवर बसले आहेत त्या भ्रष्टाचाऱ्यांनी तुमची मांडी चेपली आहे’ असे राऊत यांनी म्हटले.
घोटाळेबाज, टेंडरबाज शिंदे गटात आहेत
जळगावमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करा मग तुम्ही मुंबई महापालिकेपर्यंत या असे राऊत यांनी म्हटले. मुंबईत काय घडलं, कोणामुळे घडलं आणि घडवणारे कसे तुमच्या आजूबाजूला आहेत आणि त्यांना तुम्ही कसे अभय दिले आहे, त्यांना वाचवण्यासाठी कसे खोटे आरोप करत आहात हे आम्ही पुराव्यासह सादर करू असे राऊत यांनी म्हटले. राऊत यांनी म्हटले की, “ज्यांनी मुंबई महापालिकेत सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली, ते आमदार आणि तेव्हाचे स्थायी समिती अध्यक्ष हे त्यांच्या मागेच बसले होते हे सांगताना. ज्यांनी सगळ्यात जास्त घोटाळे केले असे म्हणतात ते सगळे टेंडरबाज लोकं शिंदे गटात आहेत. आपण कोणाविषयी बोलतोय आणि काय करतोय याचे भान कदाचित मुख्यमंत्र्यांना नसेल. भाजपने लिहून दिलेले भाषण वाचणे यापलिकडे त्यांच्याकडे काही काम राहिल्याचे दिसत नाही.”
जानेवारी महिन्यात राम मंदिराचे उद्घाटन आहे. या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरेंना ते आमंत्रण देणार नाही, कारण आम्ही सगळे राम मंदिराच्या आंदोलनात सहभागी होतो. ज्यांचे कोणतेही योगदान नाही त्यांचा तो सोहळा आहे. ज्यांचे योगदान आहे त्यांना ते अयोध्येच्या सीमेवरही येऊ देणार नाही. ज्यांनी राम मंदिरासाठी त्याग केला त्या लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उद्धव ठाकरे अशा आम्हा सगळ्यांना ते बोलावणार नाही याची मला खात्री आहे, असे राऊत यांनी म्हटले.












