चोपडा (प्रतिनिधी):- सध्या दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. दिवाळीच्या वेळेस व इतर विशेष कार्यक्रमात फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी होत असते. खास करून दिवाळीत रात्री अपरात्री फटाक्यांचे मोठमोठे आवाज होतात. त्यामुळे ध्वनीप्रदूषण तर होतेच पण रात्रीची झोपही होत नसते. ध्वनीप्रदूषणाचे कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने फटाक्यांमुळे शरीरावर अनिष्ट परिणाम होताना दिसत आहेत. “फटाके वाजवू नका असे सांगितले जाते, पण फटाके विकू नका किंवा फटाके फोडु नका” असे कुणी सांगत नाही. दिवाळी सणांत फटाके उडवल्याने भारतात दरवर्षी पाच हजारांपेक्षाही जास्त व्यक्ती अंध होतात. त्यापैकी निम्मेपेक्षा जास्त व्यक्ती बालक व तरुण असतात. जगात दरवर्षी फटाके व शोभेच्या दारूमुळे पाच लाखांपेक्षाही जास्त लोक अंध होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. म्हणुनच “मी साधारणत: १३..१४ वर्षांचा असेल तेव्हा दिवाळीत फुलबाजीने कोठी लावतांना त्याचा स्फोट झाला होता. मी लांब होतो म्हणुन त्या स्फोटातुन थोडक्यात बचावलो होतो.माझ्या उजव्या हाताची पाचही बोटे पुर्ण भाजली होती. कुणालाच न सांगता मी थंड पाण्यात हात बुडवुन बसलो होतो.थोड्या वेळाने हात पुर्ण सुजून त्यावर मोठमोठे फोडही आलेले होते. स्थानिक डॉक्टरांनी तात्पुरते उपचार केलेत.पण दुसऱ्या दिवशी मला चोपडा येथील जुना सरकारी दवाखान्यात भरती करावे लागले होते.पंधरा दिवस दवाखान्यात होतो.तरिही सहा महिन्यांपर्यंत हातावर जखमेचे व्रण दिसत होते. तेव्हापासुन आजतागायत सुमारे ४० वर्षे झाली असतील मी फटाके फोडलेले नाहित की उडविलेले नाहित,” अशी आपबिती गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी सांगीतली आहे.
हे विषारी फटाके फोडणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांना त्याचा जास्त त्रास होत असतो. त्याच्या स्फोटामुळे बारीक माती व दगड खडे डोळ्यात जाऊन इजा होते. या फटाक्यांमधील गंध व इतर रासायनिक घटक डोळ्यांसाठी घातक असतात. फटाक्यांमुळे बहिरेपणा, अंधपणा, अंग भाजणे, इजा होणे हे तर होतेच पण कारखाने व दुकानातील स्फोटांमुळे अनेकांचे मृत्यूही झालेले आहेत. फटाक्यातून निघणाऱ्या धुरामुळे डोळे, फुफ्फुसे, त्वचा खराब होते. काहींना त्याची ऍलर्जी असल्याने दमाही होतो. तसेच फटाक्यांमुळे ध्वनी जल जमीन वायू दूषित होऊन त्याचा जीवसृष्टीवर अनिष्ट परिणाम होत असतो. ज्या ठिकाणी फटाके फोडले जातात त्या ठिकाणचे तापमान ४०० ते ६०० पर्यंत वाढुन तेथील शांतीही भंग पावलेली असते. व पैशांचाही अपव्यव होत असतो. काही राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी आहे. परंतु ते जर शक्य नसेल तर अशा वेळेस ध्वनी वायु प्रदूषणाचे कायदे कडक करणे गरजेचे आहे, अशी स्पष्टोक्ती चोपडा मार्केट कमेटिचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगांवले बुद्रूक) यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.