मुंबई – राज्यातील विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण जबरदस्त ढवळून निघाले आहे.
त्यामुळे शिवसेनेतील नाराजीही आता उघड झाली आहे. महाविकास आघाडीचं सरकार अल्पमता आलं असून मुख्यमंत्री राजीनामा देतील, अशाही चर्चा रंगल्या आहेत. या घडामोडींवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर थेट निशाणा साधला. तर, त्यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेनेवर बोचरी टीका केली.
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठी बंडखोरी पाहायला मिळाली आहे. सेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे 35-40 आमदारांना घेऊन गुजरातला गेले, त्यानंतर तेथून गुवाहाटी येथे दाखल झाले आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंनी 40 आमदार आपल्यासोबत असल्याचे सांगत आणखी काही आमदार इकडे येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, शिवससेनेकडे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशावर किती आमदार वर्षावर येतील याची चर्चा होत आहे. त्यातच निलेश राणेंनी ट्विट करुन खिल्ली उडवली आहे.
निलेश राणे यांनी ट्वीट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी सध्या शिवसेनेसोबत असलेल्या आमदारांच्या आकडेवारीवरून शिवसेनेची खिल्ली उडवली. शिवसेनेपेक्षा जास्त आमदारांची संख्या सध्या मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आहे. त्यामुळे शिवसेनेकडील आमदारांची संख्या पाहता, शिवसेनेने आता IPL टीम सुरु करावी, अशी बोचारी टीका निलेश राणे यांनी केली आहे. तसेच, पक्ष चालवणं हे उद्धव ठाकरेंचं काम नाही, असे म्हणत त्यांनी टीमसाठी त्यांनी नावही सुचवलं आहे.
दरम्यान, राणेपुत्र सातत्याने शिवसेना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करत असतात. राज्यात किंवा मुंबईतील घडामोडीवरुन ते शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला लक्ष्य करतात. सध्या, राज्यातील शिवसेना नेत्यांची झालेली परिस्थिती पाहता निलेश राणे यांनी ट्वीट करून शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.
काय म्हणाले नारायण राणे
नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. नारायण राणे ट्विटमधून म्हणतात की, “संजय राऊत खुश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने,” अशी खोचक शब्दात टीका केली
‘स्वाभिमान जागृत झाला म्हणून बंड पुकारले’
कालही नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेतून या प्रकरणावर भाष्य केले होते. “अपमानित करणे, तुला मुख्यमंत्री बनवतो, असे दहा वेळा सांगून त्यांना निवडणुकीत, तसेच काही इतर घटनांमध्ये खर्च करायला सांगायचे आणि नंतर आपणच मुख्यमंत्री व्हायचे, फसवणूक करायची, असे अनेक वेळा एकनाथ शिंदेंबद्दल घडले आहे. यातून शेवटी त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि म्हणून त्यांनी हे बंड पुकारले असेल”, असे नारायण राणे यांनी म्हटले होते.