पोलिस निरीक्षकांवर कारवाई करू; अपर पोलिस अधीक्षकांचा इशारा

0
31

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

जळगाव – : शहरात ५ नोव्हेंबर रोजी अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर व्हॅनमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट होऊन चालकाचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी आहेत. दरम्यान, अवैध गॅस रिफिलिंग सेंटर दिसले तर पोलिस निरीक्षकांवर कारवाईचा इशारा आता अपर पोलिस अधीक्षक अशोक नखातेंनी दिला.

गेल्या दीड वर्षांपासून शहरात ३० ते ३५पेक्षा अधिक ठिकाणी अवैध गॅस रिफिलिंग सेंटर असून तेथे जीव धोक्यात घालून वाहनांत गॅस भरला जातो.सध्या हा गोरखधंदा अधिक फोफावला असून शहरात अनेक अवैध गॅस रिफिलिंग सेंटर आहेत. यातच ५ नोव्हेंबर रोजी वाहनात अवैध गॅस भरताना स्फोट झाला. यात एकाच मृत्यू तर दहा जण भाजले गेले. विशेष म्हणजे ही घटना पोलीस स्टेशनच्या अगदी १०० मीटर अंतरावर घडली. यामुळे पोलिसांवर नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात होता.

अशातच आता अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी ज्या पोलिस ठाणे हद्दीत असे सेंटर सुरू असेल तेथील पोलिस निरीक्षकांवर कारवाई करू असा इशारा दिला. शहरात सुरु असलेले अवैध गॅस रिफिलिंग सेंटर ते पोलिस दलातर्फे शंभर टक्के बंद केले जातील. त्यासाठी जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे असे नखाते यांनी नमूद केले आहे.

जखमींत पोलिसाचा समावेश

मंगळवारी झालेल्या गॅस स्फोटात दहा जण भाजल्याचे समोर आले होते. मात्र, जी बुलेट आगीत जळाली. त्या बुलेटचा मालक तथा धुळे पोलिस दलाच्या मुख्यालयात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल राकेश पांडुरंग पाटील (वय ३२, रा. जळगाव) हे देखील घटनेच्या वेळी त्या ठिकाणी खुर्चीवर बसलेले होते. ते सुद्धा १५ टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्फोटात जखमींची संख्या दहा झाली आहे.

Spread the love