हेमकांत गायकवाड
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व मराठी विभाग यांच्यातर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कवी रवी बुधर (अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा जव्हार) यांचे ‘जल, जंगल, जमीन व आदिवासी’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. संदीप सुरेश पाटील (अध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा) ऑनलाईन उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. टी. पाटील, प्रा. एन. एस. कोल्हे, डॉ. के. एन. सोनवणे आदि मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. के. एन. सोनवणे यांनी केले तर वक्त्यांचा परिचय डॉ. एम. एल. भुसारे यांनी करून दिला. याप्रसंगी रवी बुधर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, पर्वत रांगांमध्ये राहणाऱ्या आदिवासींचा निसर्गाशी संबंध येतो. औद्योगिक जागतिकीकरण, खाजगीकरण यांचा सर्वाधिक परिणाम आदिवासी जमातींवर झाला. त्यामुळे मोठया प्रमाणात आदिवासींचे स्थलांतर व विस्थापन झाले आहे. आदिवासी हा नदी, पाणी, जमीन यांना देव मानतो. म्हणून अदिवासी जमातीकडून या तिन्ही गोष्टींचे संवर्धन केले जाते ही महत्वपूर्ण बाब आहे. आदिवासी माणूस जंगलाशिवाय राहू शकत नाही. जननायक बिरसा मुंडा यांनी जंगल सत्याग्रह उभारला पण याची इतिहासात नोंद पाहिजे तशी घेतली गेली नाही. आदिवासींना जंगलाचे महत्व पटलेले असून त्यांना वनस्पतींचे भरपूर ज्ञान आहे. त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. आदिवासींना निसर्गातील राहू दिले तरच जंगलांचे संवर्धन होईल. यावेळी त्यांनी रानमेवा, पडाळ आणि जल-जंगल-जमीन या कवितांचे सादरीकरण करून आदिवासींची जंगल संपत्ती, धरणग्रस्त आदिवासींचे दुःख मांडून श्रोत्यांना अंतर्मुख केले. यावेळी त्यांनी शाळा, महाविद्यालयातून कार्यानुभव या विषयातून वनीकरण करून जंगलांचे संवर्धन करणारे प्रकल्प राबविले पाहिजे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्र. प्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी म्हणाले की, आदिवासी माणूस निसर्गात राहणारा माणूस आहे. आदिवासींचे जल, जंगल व जमीन याच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. आदिवासींच्या या तिन्ही गोष्टींचे जतन झाले तरच आदिवासींचे अस्तित्व टिकून राहील.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेश वाघ यांनी केले तर आभार महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. एम. रावतोळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डी. डी. कर्दपवार व डॉ. एल. बी. पटले यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी ऑनलाईन उपस्थित होते.