जळगाव – यावल तालुक्यातील सातपुड्यातील निंबादेवी धरण या ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात या धरणात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
या घटनेनंतर पुढील काही दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असून पुढील आदेश निघेपर्यंत बंदी असणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील निंबादेवी धरण हे सातपुडा पर्वत रांगेत निसर्गरम्य ठिकाणी आहे. जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी निंबादेवी धरण हे गेल्या काही वर्षांमध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. यंदा जोरदार पावसामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे या धरणाच्या सांडव्यावरील पायऱ्यांवरून पाणी वाहत असल्याने या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. मागील दोन वर्षांपासून हे धरण अधिक प्रसिद्धीस आले आहे.
अखेर पर्यटनासाठी बंदी
सुटीचा दिवस असल्यास सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. जवळच असलेल्या मनुदेवीच्या धबधबा पाहून झाल्यानंतर अनेकजण निंबादेवी येथे येत असतात. मात्र मागील आठवड्यात या ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे जिल्हा प्रशासनाने या धरणावर पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे.