व्हिलचेअर न मिळाल्याने 16 फेब्रुवारीला एका ज्येष्ठ प्रवाशाचा मृत्यू झाला होता. ही घटना मुंबई विमानतळावर घडली होती. न्यूयॉर्क येथून 80 वर्षीय अमेरीकन नागरिक मुंबईत आले होते. मात्र वाटेतच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालया (डीजीसीए) ने याची गंभीर दखल घेत 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 80 वर्षीय अमेरीकन व्यक्ती आपल्या पत्नीसोबत एअर इंडियाच्या विमानाने न्यूयॉर्कहून मुंबईला आले होते. या व्यक्तीने स्वतःसाठी आणि त्याच्या पत्नीसाठी व्हीलचेअरची सुविधा आधीच बुक केली होती. मात्र, विमानतळावर व्हीलचेअर नसल्यामुळे वृद्ध जोडप्याच्या मदतीसाठी सहाय्यक एकच व्हीलचेअर घेऊन आला. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला व्हिलचेअरवर बसवलं आणि स्वत: त्यांच्यासोबत चालत होते. ते सुमारे दीड दीड किलोमीटर चालले. इमिग्रेशन काउंटर परिसरात पोहोचेपर्यंतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. हे विमान सकाळी 11.30 वाजता उतरणार होते, मात्र ते दुपारी 2.10 वाजेपर्यंत उशीर झाला.
या विमानातील तब्बल 32 जणांचा व्हिलचेअरची गरज होती. मात्र एअर इंडियाने केवळ 15 व्हिलचेअर उपलब्ध केल्या. नियमानुसार गरज असेल तेवढ्या व्हिलचेअर उपलब्ध करणं हे कंपनीची जबाबदारी आहे. मात्र कंपनीने त्याचे उल्लंघन केले त्याचा ठपका एअर इंडियावर ठेवण्यात आला.