राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्ष नेमका शरद पवारांकडे राहणार की अजित पवारांकडे? अशी शंका जनतेच्या मनात आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगात गेलं असून, येत्या 30 सप्टेंबरपर्यंत त्याचा निकाल येईल. हा निकाल 100 टक्के अजित पवारांच्याच बाजूने असेल, असा दावा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
अजित पवार गटाची रविवारी बीडमध्ये सभा झाली. या सभेत बोलताना पटेल म्हणाले, पक्षाचं नाव आणि घडय़ाळ चिन्ह हे अजित पवारांकडेच राहणार आहे. अनेक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेकजण आपापल्या भूमिका मांडत आहेत. पण आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटाने पक्षावर आणि पक्षचिन्हावर दावा केला आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगात पोहचलं असून, 30 सप्टेंबरपर्यंत यावर निर्णय होईल. हा निर्णय अजित पवारांच्याच बाजूने असेल.
काही लोक सांगतात, पक्षात फूट नाही. पण आम्हीही तेच सांगतोय राष्ट्रवादीत फूट नाही. अजित पवारांच्या नेतृत्त्वात हा पक्षाचाच निर्णय आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या निर्णयाचे जनतेने समर्थन करावे, असेही पटेल म्हणाले.