अजित पवार ‘राष्ट्रवादी’ सोडणार ही चर्चा कुठून झाली सुरू

0
11

राज्याच्या राजकारणात 2019 पासून सातत्याने चढउतार आणि वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. भाजप शिवसेनेची सत्ता गेली अन् महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यानंतर ‘मविआ’ पायउतार झाली अन् भाजप – शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता आली. त्यादरम्यान भाजप – अजित पवारांचा अयशस्वी ‘सकाळचा शपथविधी’ झाला. त्यांची भाजपशी जवळिकीचा मुद्दा आजही गाजत आहे.

अजित पवार आजही भाजपच्या वाटेवर आहेत, अशाही चर्चा रंगल्या. त्यावर आता अजित पवारांनी स्पष्टोक्तीही दिली, पण मुळातः प्रश्न हा की, या चर्चाची सुरुवात कुठून झाली. त्याची अनेक कारणेही समोर आली आहेत. चला जाणून घेऊया.

अशी झाली सुरुवात…

राज्यातील सोळा आमदारांचा अपात्रतेचा मुद्द्यांसह सत्तांतराच्या मुद्द्यावर सुप्रिम कोर्टात सुनावणी झाली आहे. या प्रकरणी निकाल कधीही येऊ शकतो. निर्णय जर शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात लागला तर राज्यातील सरकारला धक्का पोहचू नये यासाठी भाजपने प्लॅन ‘बी’ची तयारी केली आहे. त्यातच जर ठाकरे गटाविरोधात निकाल गेला तर राष्ट्रवादीसमोर पर्याय काय? हा मुद्दा आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षात पर्यायाने अजित पवार यांच्यात काहीतरी शिजतेय अशी शक्यता निर्माण झाली आहे. तशा चर्चाही होत आहेत.

ऑपरेशन लोट्स

केंद्रीय मंत्री अमित शहांना कसेही करुन महाराष्ट्रात भाजपची सत्ता राखायची आहे. उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी ते राष्ट्रवादीची साथ घ्यायला किंवा आमदारांची फोडाफोडी करायलाही मागे हटणार नाहीत. त्यादृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी त्यांच्यासोबतच्या 40 आमदारांच्या सह्याही घेतल्याची चर्चा आहेत. सत्ता गेल्यास प्लॅन बी आणि ऑपरेशन लोट्स हे सूत्र सध्यातरी भाजप राबवताना दिसत आहे.

दमानियाच्या ट्विटने खळबळ

अंजली दमानिया यांनी राज्याच्या सत्तांतरावर आणि अजित पवार यांच्यावर एक भाकित ट्विटद्वारे केले, ट्विटमध्ये त्यांनी नमूद केले की, मंत्रालयात कामानिमित्ताने गेले. तिथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार शिंदे गटाचे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या 15 आमदारांसह लगेच भाजपबरोबर जाणार आहेत. बघू, आणखी किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची!”

नाॅट रिचेबलचे निमित्त

आठवड्यात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची चर्चा झाली. तेव्हा अजित पवार यांच्यांशी कुणाचाही संपर्क झाला नाही. राष्ट्रवादीच्या सात ते दहा आमदारांसह ते नॉट रिचेबल आहेत, असा मेसेज माध्यमांमध्ये फिरू लागला. अजित पवार यांचे पुण्यातील दोन दिवसांचे कार्यक्रम केले रद्द झाले होते. त्यामुळे ते भाजपच्या जवळ जाण्याच्या शक्यतेची मोठी चर्चा झाली.

शिंदे गटाचे वक्तव्य

विरोधी पक्षनेते अजित पवार भविष्यात काय करतील? यावर ते 15 आमदारांसह ते भाजपत सामील होतील असे शिंदे गटाच्या आमदारांचा दावा होता. अयोध्येत गेलेले शिंदे व भाजपचे आमदार हे उघडपणे सांगत होते. त्यामुळे या विधानाची चर्चा झाली आणि राज्याचे लक्ष अजित पवार यांच्या भुमिकेकडे लागले.

प्रकाश आंबेडकरांचे भाकित

”येत्या 15 दिवसांत महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होईल. दोन ठिकाणी मोठे राजकीय स्फोट होणार आहेत. त्यामुळे आपण 15 दिवस वाट बघुया” असे विधान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यांच्या विधानानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे सर्वांच्या नजरा वळल्या. यातही अजित पवारांच्या भुमिकेबाबत चर्चा रंगल्या.

सुप्रिया सुळेंचे ‘ते’ विधान

सुप्रिया सुळे म्हणाल्या, एक स्फोट दिल्लीत होईल आणि दुसरा स्फोट महाराष्ट्रात होईल. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असताना सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केले होते.

मोदींच्या डिग्रीवरचे मत

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याची मागणी करीत शंकाही उपस्थित केली. पण मविआचाच घटक पक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनी या वादावर म्हणाले की, मोदी पदवीने नव्हे तर त्यांच्या शक्तीने जिंकतात. जनतेने पदवीच्या आधारे पंतप्रधान निवडले नाहीत. लोकांनी मंत्र्यांच्या पदवीवर शंका घेणे चुकीचे आहे. हे विधान करून अजित पवार नाॅट रिचेबल राहीले होते. त्यानंतर अजित पवार हे चाळीस आमदारांसह भाजपमध्ये जातील, सह्यांची प्रक्रिया केली जात असल्याचेही एका वृत्तवाहीनीने दावा केला होता, तोही मुद्दा चर्चेत आला.

आमच्या मनात नाही…

अजित पवारांच्या मुद्द्यावर शरद पवार म्हणाले, ” जे तुमच्या मनात आहे, ते आमच्या कुणाच्याही मनात नाही. अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार, या बातम्या निराधार आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसपुरते सांगू शकतो की, राष्ट्रवादीत असे कोणतेही बंड होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सहकारी एका विचाराने काम करत आहेत.

Spread the love