अखेर खोक्या सापडला! सतिश भोसलेला प्रयागराजमधून अटक

0
34

बीड -: बीडमधून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मारहाणीच्या घटनांमुळे पोलिसांच्या रडारवर असलेला खोक्या म्हणजेच सतीश भोसले याला अटक करण्यात आली आहे. सतीश भोसले याला प्रयागराजमधून ताब्यात घेण्यात आले आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा चर्चेत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी बीडच्या शिरुरमध्ये एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याचप्रकरणी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि भाजप पदाधिकारी सतीश भोसले उर्फ खोक्या हा पोलिसांच्या रडारवर आला होता. या मारहाण प्रकरणानंतर सतीश भोसलेचे अनेक कारनामे समोर आले होते. त्यानंतर त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून सतीश भोसले हा फरार झाला होता. बीड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. अखेर आता सतीश भोसलेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे.

कोण आहे सतीश भोसले?

सतीश भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील रहिवासी आहे. मागील पाच वर्षांपासून तो राजकारात सक्रिय असून भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. सतीश भोसलेने सामाजिक कार्यातून तसेच पारधी समाजासाठी केलेल्या कार्यातून ओळख निर्माण केली.

तसेच याआधीही सतीश भोसले वर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. अलिकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांच्या कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला.

Spread the love