सुनसगाव ता भुसावळ । वार्ताहर – येथून जवळच असलेल्या गोजोरा – सुनसगाव रस्त्यावर निलगायीला वाहनाने जोरदार धडक दिल्याने निलगाय ठार झाल्याची घटना घडली.
या बाबत माहिती अशी की , सुनसगाव – गोजोरा रस्त्यावर सुदर्शन पेपर मील रस्त्याच्या जवळ पुंडलिक भोळे यांच्या शेताच्या बाजूला कोणत्या तरी अज्ञात डंपर सारख्या वाहनाने दि.२६ रोजी रात्री निलगायीला धडक दिल्याने निलगाय जागीच ठार झाली. सकाळी काही लोकांच्या लक्षात हा प्रकार आला तो पर्यंत कुत्र्यांनी निलगायीचे लचके तोडलेले होते.दि.२७ रोजी संध्याकाळ पर्यंत कुत्र्यांनी ठार झालेल्या निलगायीला रस्त्यावरुन ओढून नेल्याचे समजते. या परिसरात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे त्यात निलगाय ( लोधडे ) , हरीण ,रानडुक्कर असे प्राणी आहेत. आता सध्या सुनसगाव – गोजोरा रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले असून रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने रात्रीच्या वेळी वाहनधारक बिनधास्तपणे जोरात वाहन चालवतात त्यामुळे आता रस्त्यावर अचानक येणारी वन्यप्राणी ठार होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी फलक लावण्याची गरज आहे. वन्य प्राण्यांपासून सावधान असा कुठेही फलक नाही.












