आनंदाची बातमी! ‘अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन’: मंत्री आदिती तटकरेंची विधान परिषदेत घाेषणा

0
6

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावांबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासंदर्भातील माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरात त्यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन तसेच अन्य प्रलंबित मागण्यांबाबत आमदार शशिकांत शिंदे, योगेश टिळेकर, चित्रा वाघ, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, ॲड. निरंजन डावखरे, विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला. अंगणवाडी हा ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब वर्गासाठी महिला व बालकल्याणचा मुख्य आधार असून, राज्यात अंगणवाडी केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे व किमान वेतनापेक्षा कमी असल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च २०२५ या महिन्याचे मानधन अद्यापि त्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याचे मे २०२५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे.

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर एप्रिल २०२५ मध्ये वा त्यादरम्यान मोर्चा काढला होता. त्यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व ग्रॅज्युइटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला दिली होती. या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तत्काळ मानधन देण्याबाबत तसेच पेन्शन व ग्रॅज्युइटीच्या प्रस्तावाला मान्यता देण्याकरिता व त्यांच्या विविध समस्या सोडवून किमान वेतन देण्याकरिता शासनाने कोणती उपाययोजना, कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, याबाबतचा खुलासा करावा, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह प्रश्नकर्त्यांनी केली.

त्यावर उत्तर देताना महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले, की एकात्मिक बालविकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनाकरिता केंद्र हिस्सा, राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिश्यामधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला निधी उपलब्ध होण्यामध्ये काही अवधी लागत असतो. निधी प्राप्त होताच मानधन अदा करण्याची कार्यवाही करण्यात येते.

त्यानुसार, मार्च २०२५ चे मानधन २५ एप्रिल २०२५ मध्ये व एप्रिल महिन्याचे मानधन सहा मे २०२५ मध्ये अदा करण्यात आले असून, सद्य:स्थितीत मागील महिन्यापर्यंतचे मानधन अदा करण्यात आले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे मानधन तत्त्वावरील आहेत. त्यासाठी निधीची तरतूद करून नियमितपणे मानधन अदा करण्यात येत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावांबाबत कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

Spread the love