अंधेरीत महिलेवर सामूहिक अत्याचार ; दोघे अटकेत

0
10

मुंबई: वाढदिवसासाठी मित्राच्या घरी नेऊन एका २५ वर्षीय महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार अंधेरीत घडला आहे. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पतीसह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.

मूळची बिहारची असलेली ही महिला सातबंगला परिसरात कुटुंबियांसह राहते. तिचा पती सुरक्षारक्षक आहे. शुक्रवारी तो घरी आला आणि त्याने तिला मित्राच्या वाढदिवसाला जायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर ते सायंकाळी अंधेरीतील सुरेशनगर परिसरात राहणाऱ्या व्यक्तीकडे गेले होते. आपला मित्र एका नामांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करतो, असेही त्याने तिला सांगितले होते.

ती पतीसह त्याच्या मित्राकडे गेल्यानंतर पती आणि त्याच्या मित्राने मद्यप्राशन केले. त्यानंतर त्यांनी तिच्यावर अत्याचार केला. कुठे वाच्यता केल्यास तुला ठार मारू, अशी धमकीही त्यांनी तिला दिली. त्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. रात्री उशिरा ती पतीसह घरी आली. घडलेला प्रकार तिने तिच्या एका नातेवाईक महिलेला सांगितला. नातेवाईक महिलेने तिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले.

पीडित महिलेने नातलग महिलेसह आंबोली पोलीस जाऊन तेथील पोलिसांना घडलेला प्रकार कथन केला आणि तक्रार अर्जही दिला. दोन्ही आरोपींविरुद्ध सामूहिक लैंगिक अत्याचार आणि ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आंबोली पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

Spread the love