(भुसावळ तालुक्यात सुनसगाव येथून प्रारंभ )
प्रतिनिधी जितेंद्र काटे
भुसावळ – महाराष्ट्र राज्य सरकारने घरकूल धारकांना घरकूल बांधकामासाठी वाळू / रेती मिळणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. या योजनेला भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथून सुरवात करण्यात आली आहे.
या बाबत माहिती अशी की शासनाकडून ज्यांना घरकूल नाही अशा नागरीकांसाठी वेगवेगळ्या नावाने घरकूल योजना आहेत त्यामुळे ज्याचे नावाने घरकूल मंजूर झाले आहे त्या लाभार्थीला पाच ब्रास वाळू मोफत देण्यात येणार आहे. या योजनेची सुरवात सुनसगाव येथून करण्यात आली दि.२० रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात घरकूल धारकांना बोलवून भुसावळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जयंतकर यांनी माहिती दिली. गोंभी व सुनसगाव मिळून जवळपास १६० घरकूल मंजूर असल्याने किमान एक दोन ब्रास रेती मिळणार असल्याचे समजते .यासाठी लाभार्थीच्या नावाने महसूल विभाग पास देईल तसेच शासनाची रायल्टी लागणार नसून रेती छाननी व वाहतूकीचा खर्च स्वता घरकूल धारक लाभार्थी यांना करावा लागणार आहे तसेच मिळालेल्या पास वर फक्त लाभार्थीच्या घरापर्यंत पास वैध राहील असे ही सांगण्यात आले आहे. सुनसगाव येथे वाघुर नदी गावाला लागून असल्याने या योजनेला सुरवात सुनसगाव येथून करण्यात आल्याचे ग्रामपंचायत कार्यालयाकडून समजले.
घरकूल संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा सुरु असताना आरोप प्रत्यारोप करीत ग्रामपंचायत पदाधिकारी यांची ‘ तू तू मैं मैं ‘ झाल्याची चर्चा गावात सुरु होती.
येथील वाघुर नदीच्या पाच नंबर शिवारातील कोल्हापूर बंधाऱ्यात जाऊन भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ सचिन पानझडे , विस्तार अधिकारी जयंतकर ,तहसीलदार कार्यालयातील नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी प्रविण पाटील , सरपंच सौ. काजल कोळी , उपसरपंच एकनाथ सपकाळे , पोलीस पाटील खुशाल पाटील ,ग्रामसेविका प्रतिभा तायडे, कोतवाल संजय गोसावी , ग्रामपंचायत सदस्य ,पदाधिकारी तसेच रेती वाहतूक करणारे व्यावसायीक व लाभार्थी उपस्थित होते. ही योजना खरोखर उत्तम प्रकारे राबविली जाणार की लाभार्थी च्या नावाखाली या योजनेचा ‘ फियास्को ‘ होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.