जळगाव – येथील आव्हाणा रस्त्यावर आढळून आलेल्या कामगार सुरेश सोळंकी खून प्रकरणी एलसीबीने कसून तपास करीत सदरहू घटना उघडकीस आणली आहे. सदर घटना ही अनैतिक संबंधावरून घडली असून महिलेच्या पतीने दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्याने सुरेश सोळंकीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याचे उघड झाले आहे.
घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता तरुणाचा मृतदेह पालथ्या अवस्थेत दिसून आला. मयत सुरेश सोलंकी हा पोलिसांच्या दृष्टीने सुरुवातीला अनोळखी होता. मयत सुरेश सोलंकी याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जबर वार केल्याचे देखील दिसत होते. मृतदेहापासून जवळच एका महिलेचे मंगळसुत्र आणि पायातील पैंजण आढळून आले. याशिवाय एक विस रुपयांचे नाणे देखील आढळून आले. पोलिसांनी या सर्व वस्तू तपासकामी ताब्यात घेत पुढील तपासाला सुरुवात केली. ज्याअर्थी घटनास्थळी महिलेचे मंगळसुत्र आणि पायातील पैंजण आढळून आले त्याअर्थी घटनेच्या वेळी व ठिकाणी एक महिला हजर होती हे स्पष्ट झाले.