चाळीसगाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतादादातून चळवळ चालवून १०० टक्के महिलांना, अस्पृश्य समाजाला तसेच सर्वच शूद्र समाजास माणूसपण व प्रतिष्ठा प्राप्त करून दिली मात्र त्यांच्या कार्याची , संघर्षाची , तत्वांची आम्ही आजही दखल न घेता त्यांचे भांडवल करून चळवळ नाममात्र स्वरूपात चालवीत असतो ही अतिशय खेदाची गोष्ट आहे . असे विचार प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चाळीसगाव येथे झालेल्या टांगा अपघाताच्या ९६ व्या स्मृति दिनानिमित्त जन आंदोलन खान्देश विभाग तर्फे २३ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा स्मारक , घाट रोड येथे आयोजित अभिवादन सभेत भाषण करताना वाघ बोलत होते.
जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की , २३ ऑक्टोबर १९२९ रोजी बाबासाहेब ४० गावला आले असता आम्ही केवळ भावनिक होऊन बेजबाबदारपणे वागलो त्यामुळे बाबासाहेबांचा टांगा अपघात झाला व बाबासाहेबांना आयुष्यभराची काठी लागली . आम्ही केवळ भावनिक होऊन , बाबसाहेब , बाबासाहेब असा जप करून बाबासाहेबांची चळवळ चालविली तर आपण काहीच यश संपादन करू शकणार नाही तर वैचारिक , तात्विक अधिष्ठान घेऊन दूरदृष्टीने चळवळ चालविणे आपली जबाबदारी आहे , केवळ याच्याशी युती , त्याच्याशी युती करणे , याची तळी , त्याची तळी उचलणे म्हणजे आंबेडकरी चळवळ चालविणे नाही .
आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक तथा जन आंदोलन खान्देश विभाग प्रमुख प्रा. गौतम निकम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, बाबासाहेबांनी चाळीसगाव येथे वेळोवेळी भेट दिली आहे , जाहीर सभा घेतलेली आहे , या तालुक्यातील व्यक्तीला आमदार केले आहे , त्यांच्या उपकारा मुळे हजारो लोक सुखाने जगत आहेत मात्र आम्ही ९६ वर्षात बाबासाहेबांचे स्मारक उभे करू शकलो नाही हे आमच्या पराभूत मानसिकतेचे लक्षण जसे आहे तसेच बाबासाहेबांन विषयीचा कृतघ्न पणा सुध्दा आहे असे स्पष्ट प्रतिपादन केले . त्यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की बाबासाहेबांना चाळीसगाव मध्ये टांगा अपघात होऊन कायमची काठी लागली व याच चाळीसगाव मध्ये बाबासाहेबांना दिलेली पैशाची थैली मारली गेली हा एक काळा इतिहास आहे .
अनिल पगारे यांनी बाबासाहेबांच्या चाळीसगाव भेटीचे ऐतिहासिक दाखले आज उपलब्ध असल्याने यातून नव्या पिढीने आदर्श घेऊन नव्या दमाची नवी चळवळ उभी करावी असे आवाहन केले .
कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण जयसिंग वाघ यांच्या हस्ते करण्यात आले . त्या नंतर माजी आमदार राजीव दादा देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कदम , प्रास्ताविक ॲड. जगदीश निकम , स्वागत प्रा. प्रदीप रॉय , परिचय प्रा. डॉ. गौतम सदावर्ते तर आभारप्रदर्शन संगम गवळे यांनी केले .
कार्यक्रमास काळू संसारे, संजय महिरे, विकास पटाईत, संजय बागुल, अजय निकम, महेंद्र निकम, भारत अहिरे , सागर निकम तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेले कार्यकर्ते , पदाधिकारी मोठ्यासंखेने हजर होते .