भुसावळ :- वृत्तपत्रं खरेतर समाजातील अनिष्टबाबी , अन्याय , अत्याचार , सरकारची चुकीची धोरणे यावर बोट ठेऊन राष्ट्रीय कार्य करणारी एक जबाबदार संस्था असते . भारतीय वृत्तपत्रांचा विचार केला तर ते एकांगी स्वरूपात काम करीत असल्याचे वेळोवेळी दिसत आले . मात्र दैनिक सम्राटचे संस्थापक संपादक बबन कांबळे यांनी या भूमिकेला छेद देऊन अत्यंत धाडसाने पत्रकारिता केली स्वतंत्र सम्राट नावाचे दैनिक चालवून वृत्तोत्रकरितेला नवी दिशा दिली असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.
दिनांक १५ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथील पंचायत समिती सभागृहात कालकथित बबन कांबळे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यवक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते. जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की समाजातील दबलेल्या घटकाचे एकमेव मुखपत्र म्हणून काम करीत असताना बबन कांबळे यांनी दलीत , आदिवासी , भटका या समाजाशी नाळ जोडली . वाड्यावस्तिवर जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले . त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचारा विरुध्द सम्राटच्या माध्यमातून आवाज उठविला , हे करत असताना त्यांनी शासनाच्या विरोधाची सुद्धा पर्वा केली नाही . या समाजाचे प्रश्न जेंव्हा वेशीवर टांगले जाऊ लागले तेंव्हा या समाजात नवा आत्मविश्वास निर्माण झाला . यातून बाबासाहेबांच्या मूकनायकने केलेल्या सामाजिक अभीसरणाची प्रचिती येते . मूकनायक हे बाबासाहेबांनी चळवळीचे मुखपत्र ठेऊन राष्ट्रीय प्रश्नांबरोबरच अस्पृश्य समाजाच्या प्रश्नांना राष्ट्रीय प्रश्न म्हणून मांडून शासनाचे लक्ष वेधले तेच काम सम्राटने करून बाबासाहेबांचा वारसा पुढं चालविला . वाघ यांच्या भाषणाने श्रोते अत्यंत प्रभावी झाले.
अध्यक्षस्थानी री. पा. ई.चे जिल्हाध्यक्ष राजुभाऊ सूर्यवंशी होते त्यांनी आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त करताना सांगितले की , बबन कांबळे यांनी सम्राट दैनिकाच्या माध्यमातून लोकचळवळ उभिकरून उपेक्षित समाजास न्याय मिळवून देण्याचे काम केले . त्यांच्या माध्यमातून सम्राट पेपराचा दबदबा मंत्रालयात तयार झाला होता . त्यांनी आपल्या अग्रलेखातुन प्रत्यक्षात सरकारला घाम फोडलेला आहे . बबन कांबळे सरांनी आपल्या तत्त्वाशी कधीही तडजोड केली नाही अत्यंत निर्भिडपणे त्यांनी गावकुसाबाहेर असलेल्या समाजाला न्याय मिळवून देण्याचा , अन्याग्रस्त समाजाला लढण्याचे बळ देण्याचा प्रयत्न केला.
सुरुवातीस नवनिर्वाचित नगरसेवक रोहन सूर्यवंशी नगरसेविका शोभा इंगळे नगरसेविका पूजा तायडे यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बबन कांबळे सरांच्या जीवनावरती राजेश आव्हाड , शोभा इंगळे , राजश्री सुरवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सम्राट पेपर अधिकाधिक वाढविण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, बबन कांबळे यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजुभाऊ सूर्यवंशी प्रमुख वक्ते जयसिंग वाघ, यांच्यासह नगरसेवक रोहन सूर्यवंशी, नगरसेविका शोभा इंगळे, नगरसेविका पूजा तायडे, सुरेश वानखेडे, ग्रामसेवक प्रशांत तायडे, महेंद्र तायडे, युवराज नरवाडे आदींसह स्त्री – पुरुष मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विजय साळवे, प्रवीण कांबळे, सतीश कांबळे, विश्वनाथ ठाकरे मधुकर राऊत, रोशन वाकोडे, ओंकार सोनवणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साळवे आणि आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजेश तायडे यांनी केले . कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व जनतेने बबन कांबळे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले .










