बाबासाहेबांची भालोद भेट एक ऐतिहासिक ठेवा : जयसिंग वाघ 

0
2

भालोद :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दिनांक २२ ऑक्टोबर १९२९ रोजी भालोद गावी आलेले असून त्यांनी आताच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व न्यू इंग्लिश स्कूल ला भेट दिलेली आहे . शाळेच्या शेरेबुकात त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात शेरा लिहून सही केलेली आहे . या ऐतिहासिक घटनेचे महत्व लक्षात घेऊन त्या ऐतिहासिक भेटीने नवीन पिढीला ऊर्जा मिळत राहील , ती भेट एक ऐतिहासिक ठेवा असल्याने त्याचे जतन व संवर्धन करणे आजच्या पिढीचे काम आहे असे मत प्रसिद्ध साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले.

बाबासाहेबांच्या भालोद भेटी निमित्त आयोजित न्यू इंग्लिश स्कूल मध्ये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर , भालोद येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.

जयसिंग वाघ यांनी आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की बाबासाहेब हे भालोद येथे आले तेंव्हा ते आमदार तसेच स्टार्ट समितीचे सदस्य होते . त्यांच्या सदस्यत्वाला मंत्रिपदाचा दर्जा होता . त्यांचा हा दौरा पूर्णतः शासकीय होता . त्यांच्या सोबत सेनु नारायण मेढे व अन्य पुढारी होते . बाबासाहेबांच्या या भेटीत शाळेच्या संचालकांनी त्यांचे यथोचित स्वागत केले व सर्वतोपरी सहकार्य केले ही बाब त्या काळात नवा इतिहास घडविणारी होती असेही वाघ यांनी स्पष्ट केले.

शाळेचे मुख्याध्यापक डी. व्ही. चौधरी यांनी बाबासाहेबांनी आमच्या शाळेला दिलेली भेट ही आमच्या करिता एक सुवर्ण योग असून आम्ही स्वतःला धन्य समजतो . बाबासाहेबांनी लिहिलेला शेरा हा आमच्या संस्थेचा मुकुटमणी आहे , आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी या बाबत सांगत आलो यातून अनेकांनी प्रेरणा घेऊन कार्य केले आहे असे विचार . व्यक्त केले.

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सपकाळे यांनी बाबासाहेबांच्या या भेटीला या गावाचे एक सोनेरी पान असल्याचे सांगून भालोदच्या जनतेने या घटनेचे सोने करावे , बाबासाहेबांच्या विचारांचा , चळवळीचा वारसा जतन करून चळवळीच्या माध्यमातून नवा आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले.

बाबुराव वाघ यांनी बाबासाहेबांनी जळगाव जिल्ह्याला खूपदा भेटी देऊन आपल्यात नवचैतन्य निर्माण केले आहे , आम्हाला माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचे शिकविले आहे असे मत मांडले .

कार्यक्रमास ॲड. आनंद कोचुरे , चेतन नन्नवरे , डी. एम. भालेराव , गोपाळ भालेराव , बाबा साळुंके, कुंदन तायडे , डॉ. भिका साळुंके, ॲड. यू. एम. जगझाप , रेखा सदावर्ते , कल्पना तायडे , आशुतोष भालेराव , निलवंती बोरोले यांच्यासह बहुसंख्य जनता हजर होती.

Spread the love