येथील बांभोरी गावाजवळील गिरणा नदीच्या पुलाजवळ पाळधीकडुन येणारा एक ट्रक नादुरुस्त झाल्याने दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या.
खासगी वाहने वाहतूकीची शिस्त तोडुन विरूद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत होते.
तर, एका शासकीय वाहनानेदेखील विरूद्ध बाजुने जाऊन ‘हम करे सो कायदा’ अशी परिस्थिती निर्माण केली होती.
वाहतुक कोंडीत अडकलेल्या एस. टी.मधील प्रवाशांनी या शासकीय वाहनाच्या चालकाच्या बुद्धीची किव केली. विशेष म्हणजे वाहतुक पोलीसदेखील केवळ पाळधीकडुन येणाऱ्या वाहनांना अगोदर सोडत होते. त्यामुळे जळगांवमधुन धुळेकडे जाणाऱ्या एस. टी. बससह खासगी वाहनांची कोंडी झाली होती.
शहर वाहतूक व्यवस्था नियंत्रण करणाऱ्या पोलीस यंत्रणेतील समन्वयाचा अभाव या निमित्ताने पाहायला मिळाला.
शहरात जड वाहनांना प्रवेश देण्याबाबत काही नियम आहेत काय? त्यावर वाहतूक नियंत्रण शाखेचे काही नियंत्रण आहे काय? आदी प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत.
“जळगांवहून धुळे येथे जाण्यासाठी नाशिक- जळगाव बसमध्ये सायंकाळी सुमारे पाऊणे पाचला बसलो. मात्र आयटीआयजवळ बस आली असता वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
जळगांव शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जड वाहनांना शहरात प्रवेश देण्याबाबत नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करून सामान्य नागरिक व प्रवाशांना दिलासा दिला पाहिजे.”












