जळगाव जामोद – जळगाव जामोद वरून मध्य प्रदेशात इंदोरकडे जाणाऱ्या आयशर गाडीच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने आयशरणे समोरून येणाऱ्या पल्सर आणि होंडा अशा दोन मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याची घटना आज २१ सप्टेंबर रोजी निमखेडी फाट्याजवळ दुपारी घडली.
या अपघातात दोन युवक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद वरून बऱ्हाणपूरकडे जाणारे आयशर क्रमांक सी.जी.०४ एन झेड ४५२५ या वाहनाचा चालक वसीम खान, राहणार महू हा इंदोरकडे जात असताना निमखेडी फाट्यानजीक पल्सर क्रमांक एमएच २८ बीआर ८४३४ व स्प्लेंडर क्रमांक एमएच २८ बी यु ७४४९ जळगावकडे येत असताना आयशरने दोन्ही दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेमध्ये पल्सरवर स्वार शाहरुख नजीर तडवी (३०), इब्राहीम मस्तान (३६) हे दोघे जागीच ठार झाले. तर स्प्लेंडर वरील स्वार आसिफ हुसेन तडवी (३७) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव येथे हलविण्यात आले आहे. वृत्तलेखन पर्यंत पोलीस स्टेशन जळगावला गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.












