जळगाव :- बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे महस्थविर चंद्रमणी यांचे मुख्य वारसदार तथा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बौद्ध धम्म गुरू ज्ञानेश्वर महास्थाविर यांना आज लखनौ येथील मेदांता हॉस्पिटल मध्ये निर्वाण प्राप्त झाले.
पूज्य भदंत ज्ञानेश्वर महास्थविर हे कुशिनगर बौद्ध भिख्खू संघाचे अध्यक्ष तथा कुशिनगर येथील म्यानमार बौद्ध विहाराचे प्रमुख होते . त्यांनी दिनांक 5 ऑगस्ट 1963 ला पूज्य भदंत चंद्रमणी महास्थाविर यांच्या हस्ते भिख्खू म्हणून दीक्षा घेतली होती . दिनांक 8 मे 1972 ला महास्थाविर चंद्रमणी यांच्या निर्वाण प्राप्ती नंतर भदंत ज्ञानेश्वर त्यांचे मुख्य वारसदार झाले.
महास्थाविर ज्ञानेश्वर यांना म्यानमार सरकारने 2023 मध्ये अभिधजा महारथा गुरू या पुरस्काराने सन्मानित केले होते. महास्थाविर ज्ञानेश्वर काही दिवसांपासून आजारी होते. 11 ऑक्टोबर रोजी त्यांना मेदांता हॉस्पिटल मध्ये भरती केले होते मात्र आज त्यांनी शेवटचा श्वास घेतला . त्यांचे पार्थिव कुशिनगर येथील म्यानमार बुद्ध विहारात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून अंतिम संस्कार 10 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यांना 2023 मध्ये प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली ही माझ्या जीवनातील मोठी बाब आहे.
महास्थाविर ज्ञानेश्वर यांनी सलग 62 वर्षे बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार केला. त्यांना मानणारा वर्ग भारता सोबत विविध देशांमध्ये मोठ्या संख्येने आहे. त्यांनी भारता सोबतच म्यानमार देशात बौद्ध विहारांची निर्मिती केली. त्यांच्या निर्वाणा मुळे भिख्खू संघाची अपरिमित हानी झाली आहे, या शब्दात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी एका पत्रकाद्वारे अर्पण केली आहे.












