मोठी बातमी! विधानसभा अध्यक्ष 16 आमदार अपात्र प्रकरणी आता निर्णय घ्यायला मोकळे?

0
43

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना नोटीस बजावली होती. राहुल नार्वेकर यांनी आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांचा वेळ दिला होता.

त्यानंतर आता दोन्ही गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे उत्तर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसला उत्तर दिल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही गटाकडून वेगवेगळा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ठाकरे गटाने नेमकं काय उत्तर दाखल केलं?

ठाकरे गटाच्या सर्व 14 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे उत्तर पाठवलं आहे. आम्ही 14 आमदार खरी शिवसेना आहोत. ठाकरे गटाकडून 262 पानी उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आलं आहे. आम्ही राजकीय पक्ष असल्याचं सांगत शिवसेनेची घटना आणि व्हीपची कॉपी ठाकरे गटाने पाठवली आहे. 2018च्या एडीएम बैठकीत उद्धव ठाकरे हेच प्रमुख होते, असं उत्तर ठाकरे गटाने दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह इतर 40 आमदारांनी पक्षाच्या घटनेचं उल्लंघन केलं आहे. पक्षाची घटना मोडून शिंदे गटाने अनधिकृतरित्या पक्षावर दावा केला. 2018 मध्ये सुनील प्रभूंचा व्हीप लागू होता. तसेच राजकीय पक्षाचाच व्हीप लागू होणार कारण सुप्रीम कोर्टाच्या निकालात तसा उल्लेख आहे, असं स्पष्ट उत्तर ठाकरे गटाच्या आमदारांनी दिलं आहे.

अनिल परब यांची प्रतिक्रिया

“आमच्या पक्षाच्या सर्व 14 आमदारांनी उत्तर दिलेलं आहे. हे उत्तर 242 पानांचे आहे. त्यामध्ये आम्ही आमची बाजू ठामपणे मांडलेली आहे. मूळ शिवसेना ही आमची आहे. एजीएम आमची 2018 झाली होती आणि त्यानुसार तेव्हाची जी मूळ शिवसेना होती तीच खरी शिवसेना आहे. यानंतर त्यांनी स्वतःचा गट स्थापन केला, हे आम्ही त्या नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे”, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली.

‘आम्हाला न्याय नाही मिळाला तर…’

ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी देखील या विषयी प्रतिक्रिया दिली. “आम्ही आज 14 आमदारांचं उत्तर दिलेलं आहे आणि विधानसभा अध्यक्षांकडे ते पाठवलं आहे. यामध्ये आम्ही आमची ठोस बाजू मांडली आहे. जी भूमिका आम्ही सुप्रीम कोर्टात मांडली होती त्या अनुषंगाने या पत्रामध्ये आम्ही सगळं काही खरच सत्य परिस्थिती मांडली आहे. आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आहे. आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. त्या ठिकाणी न्याय मागू. अवघे काही दिवसच राहिलेले आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे”, अशी प्रतिक्रिया सुनील प्रभू यांनी दिली.शिंदे गटाने नेमकं काय उत्तर दाखल केलं?

विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या 14 आणि शिंदे गटाच्या 40 आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीसला शिंदे गटातील 16 आमदारांनी वेगळा रिप्लाय फाईल केलाय. तसेच उर्वरित 24 आमदारांनी एकत्र रिप्लाय फाईल केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिपबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आमचाच व्हिप हा निवडणूक आयोगाने मान्य केलेला आहे आणि त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत हे यात नमूद आहे. त्यासोबतच शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने आम्हाला दिल्याने आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा देखील करण्यात आलेला आहे. या रिप्लायासोबत त्यांनी शपथपत्र देखील जोडलं आहे.

Spread the love