जळगाव -: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 प्रचाराची आज सांगता होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला आहे.
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर अज्ञाताकडून आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पोलीस तपास सुरु आहे.
तीन रिकामी काडतुसे आढळली
अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन यांच्या घरावर एका अज्ञात व्यक्तीने तीन गोळ्या झाडल्या. यामुळे मोठा आवाज झाल्याने शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन खडबडून जागे झाले. त्यांनी याबाबत तपास केला असता काचेच्या खिडकीचा चक्काचूर झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना तीन रिकामी काडतुसे आढळून आली.