बॉलिवूड अभिनेता गोविंदा याची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. गोविंदाची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला प्रचार अर्धवट सोडावा लागला. महायुतीचा स्टार प्रचारक अभिनेता गोविंदा जळगावमध्ये प्रचार करत असताना त्याची तब्येत बिघडली.
गोविंदाला गोळी लागलेला पाय दुखू लागला आणि त्याला अस्वस्थ वाटू लागले. यानंतर गोविंदाने प्रचार थांबवल्याची माहिती समोर येत आहे. गोविंदाने काही महिन्यांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून सध्या तो महायुतीचा प्रचार करत आहे.
भररॅलीत अचानक गोविंदाची तब्येत बिघडली
सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून राजकीय नेतेमंडळींसह सेलिब्रिटीही प्रचारात गुंतल्याचं दिसत आहे. अभिनेता गोविंदा शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होता. पाचोरा येथे गोविंदाला गोळी लागलेला पाय दुखू लागला. पाय दुखण्यासह त्याला छातीत अस्वस्थ जाणवू लागलं. यानंतर त्याने, रोड शो अर्धवट सोडून त्याने मुंबईकडे परतणे पसंत केल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात शनिवारी मुक्ताईनगर, बोडवड, पाचोरा, चोपडा या ठिकाणी गोविंदा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी पोहोचला होता.
हेलिकॉप्टरने तडकाफडकी मुंबईला रवाना
गोविंदा पाचोरा येथे पोहोचल्यानंतर त्याच भव्य स्वागत करून त्यांचा रोड शो सुरू करण्यात आला. पण, यानंतर काही वेळातच गोविंदाला अस्वस्थ वाटू लागलं. यासोबत गोविंदाच्या गोळी लागून दुखापत झालेल्या पायामध्येही वेदना होऊ लागल्या. यानंतर आपण खबरदारी म्हणून आपला दौरा रद्द करत असल्याची प्रतिक्रिया गोविंदाने दिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहा आणि महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांना विजय करा, असं आवाहन करत गोविंदा मुंबईकडे रवाना झाला.