भाजपचे आता हिरवे हिंदुत्व! मुस्लिम मतांसाठी आता दर्ग्यात जाऊन कव्वाल्या ऐकणार, मोदी धोरणाचा प्रचार होणार दर्ग्यांच्या भोंग्यातून

0
31

मते मिळवण्यासाठी भाजपने कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याचा प्रकार नवीन नाही. सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडले असा गावगन्ना करणारा भाजप आता मुस्लीम मतांसाठी दर्ग्यात जाऊन कव्वाल्या ऐकणार आहे. एवढेच नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर कव्वाल्या रचण्यात येणार असून त्या दर्ग्यांमधून भोंग्यावर ऐकवल्या जाणार आहेत. एवढेच नाही तर ज्या मदरशांना भाजपने आजवर देशद्रोही ठरवले त्याच मदरशात जाऊन भाजप नेते उर्दूत संवाद साधणार आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा जनाधार कमी होत असल्याचे अनेक सर्वेक्षणांतून समोर येत आहे. असुरी बहुमत कमी होण्याचा अंदाज या सर्वेक्षणातून व्यक्त होत आहे. त्यामुळे भाजपने बहुमत टिकवण्यासाठी धडपड चालू केली आहे. याच धोरणाचा एक भाग म्हणून आता मुस्लिमांची मनधरणी भाजपकडून करण्यात येणार आहे. काँग्रेसला कायम मुस्लीम लांगूलचालनावरून खिजवणारा भाजप आता त्याच मार्गावरून पुढे जात आहे. उत्तर प्रदेशातील प्रखर हिंदुत्ववादी योगी सरकारने ‘सुफी संवाद महाअभियान’ राबवणार आहे. या अभियानाअंतर्गत भाजप नेते दर्ग्यांवर जाऊन कव्वाल्या ऐकणार आहेत. एवढेच नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण सांगणाऱया कव्वाल्या तयार करण्यात येणार असून दर्ग्याच्या भोंग्यावरून त्या ऐकवण्यात येणार आहेत.

मदरसे हे देशद्रोही कटकारस्थान रचणारे केंद्र आहेत. या मदरशांमधून देशद्रोही शिक्षण दिले जाते, असा कंठशोष भाजप नेहमीच करत आला आहे, परंतु मुस्लीम मतांसाठी आता भाजप नेते मदरशांमध्ये जाऊन उर्दूत संवाद साधणार आहेत. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण उर्दूतून छापण्यात येणार असून ते मदरशांमध्ये वाटण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या ‘मन की बात’चे उर्दूत भाषांतर करण्यात येणार असून तेदेखील वाटण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील ‘सुफी संवाद’ आणि ‘उर्दू संवाद’ भाजप अल्पसंख्यांक मोर्चा देशभरात राबवणार आहे. केंद्रातील मोदी सरकार तसेच विविध राज्यांमधील भाजपची सरकारे मुस्लिमांशी कोणताही भेदभाव करत नाहीत हे दाखवण्याचा या अभियानातून प्रयत्न करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशात सध्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका आटोपल्या की सुफी संवाद महाअभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी उत्तर प्रदेशातील सर्व दर्ग्यांची तसेच मदरशांची यादी बनवण्यात आली आहे.

Spread the love