राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यासाठी ते दिल्लीमधील नेत्यांच्या गाठी भेटी घेत असल्याचा खुलासा भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत केला आहे.
अजित चव्हाण म्हणाले की, एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येण्यासाठी दिल्लीमध्ये जाऊन भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी भाजपामध्ये येण्यासाठी भाजपा त्यांच्या घरी बोलवायला गेली नव्हती. मात्र त्यांच्याकडून भाजपामध्ये येण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
हा भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींचा निर्णय
एकनाथ खडसेंना भाजपमध्ये घ्यावे किंवा न घ्यावे हा भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींचा निर्णय असणार आहे. जो निर्णय घेतला जाईल तो कार्यकर्त्यांना मान्य असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या काही माध्यमात आल्या असल्या तरी त्यात तथ्य नसल्याचेही अजित चव्हाण यांनी म्हटले आहे.
भाजप प्रवेशाच्या चर्चांवर एकनाथ खडसेंचे स्पष्टीकरण
एकनाथ खडसे म्हणाले की, काही कामांसाठी मी दिल्लीला गेलो होतो. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. काही निर्णय घ्यायचा असेल, तर तो विचार करून घ्यायचा असतो. कार्यकर्त्यांशी, पक्षाशी, नेत्यांशी बोलून घ्यायचा असतो. कारण अतिशय महत्त्वाचा निर्णय राहणार आहे. मात्र, अशा कोणत्याही हालचाली नसल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.