दोन दुचाकींची समोरासमोर धडक; वृद्धाचा मृत्यू, दोन जण जखमी

0
40

वरणगाव- : बोदवड रस्त्यावर भरधाव वेगाने जाणार्या दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामुळे झालेल्या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. या जखमींनाजळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

भुसावळ तालुक्यातील आचेगांव येथील शरद भास्कर पाटील (वय ७०) असे अपघातात मृत झालेल्या वृद्धांचे नाव आहे. शरद पाटील हे दुचाकीने वरणगावकडून आचेगावकडे जात होते. याचवेळी बोदवड मार्गावर समोरून जोरदार वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. दोन दुचाकींची धडक इतकी जोरदार होती, कि दोन्ही दुचाकींवरील तिघेजण रस्त्यावर फेकले गेले. यात तिघांनाही जबर मार लागला होता.

यानंतर तिघांना वरणगांव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता शरद भास्कर पाटील यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर दुसऱ्या दुचाकीवरील चालक शेख गनी शेख मन्यार (वय ६६) व अशोक रामदास खराटे (वय ५५, दोघे रा. बोदवड) या दिनही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून दोघांवर सध्या उपचार सुरु आहेत.

जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असताना याठिकाणी वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने शरद पाटील यांच्यावर वेळीच उपचार होऊ शकले नाही. यामुळे त्यांचा मृत्यु झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांकडून करण्यात आला. यामुळे काही वेळ रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला होता. अपघातप्रकरणी वरणगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Spread the love