लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार की नाही; आदिती तटकरेंनी दिली गूड न्यूज

0
20

लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची छाननी होणार असल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी समोर आली होती.

त्यामुळे आता निकषाचे कारण दाखवत या योजनेतून मोठ्या संख्यने महिलांना बाहेर केले जाणार असल्याची चिंता लाडक्या बहिणींमध्ये होती. परंतु आता आदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. या योजनेत सरसकट छाननी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. तसेच या योजनेची छाननी हे केली जाईल, परंतु ती तक्रारींच्या आधारे केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रात प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. पंरतु मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत योजना सुरूच राहील आणि या योजनेची रक्कम आगामी बजेटमध्ये 2100 रुपये करण्याचा आमचा विचार आहे असे देखील सांगितले होते. त्यासाठी लागणारी तरतुद देखील करण्याची तयारी आम्ही करत आहोत. राज्यातील सर्व आर्थिक स्रोत यांचा अभ्यास करून अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यामुळे योग्य पद्धतीने निर्णय केले जातील. 2100 रुपये देण्याचा निर्णय पक्का आहे. तसेच जी आश्वासने आम्ही दिली आहेत, ती नक्कीच पूर्ण करू, असा विश्वास देखील फणवीस यांनी दिला होता.

सरसटक छाननी होणार नाही – अदिती तटकरे 

दरम्यान दोन दिवसांपासून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी होणार असून लाभार्थी महिलांची संख्या कमी केली जाईल असे म्हटले जात होते. यावर राष्ट्रवादीच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आदिती तटकरे यांनी या सर्व चर्चा फेटाळ्या आहेत. तसेच अशा प्रकारे सरसटक छाननी करण्याचा सरकारचा कोणताही निर्णय झालेला नाही, तक्रारी आल्या तर त्याआधारे छाननी केली जाईल असे त्यांनी सांगितले.

पडताळणी करूनच लाभ दिला जातोय – आदिती तटकरे

आदिती तटकरे म्हणाल्या की, “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. याबाबत सुरू असलेली चर्चा चुकीची आहे. आम्ही ही योजना अतिशय पद्धतशीरपणे आणि पडताळणी करून राबवलेली आहे. प्रत्येक लाभार्थी महिलेची आधार सिडिंग करून लाभ देण्यात आला आहे. राज्यातील 2 कोटी 40 लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे. आम्ही सर्व पडताळणी करूनच महिलांचा या योजनेत समावेश केला आहे,” असेही त्यांनी सांगितले.

तक्रार आली तरच छाननी – आदिती तटकरे 

आदिती तटकरे यांनी अधिक स्पष्टपणे या योजनेसंदर्भातील गैरसमज दूर करताना सांगितले की, “एखाद्या लाभार्थीबाबत तक्रार आली तर त्याआधारे छाननी केली जाईल. मी महिला आणि बालविकास खात्याची मंत्री असेपर्यंत कोणतीही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नव्हती. आता नव्याने तक्रार आली असेल तर मला माहिती नाही. परंतु तक्रारी असतील तरच त्यासंदर्भातील छाननी होईल. या योजनेत मोठ्या प्रमाणात छाननी होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Spread the love