बौद्ध धर्मात भिक्खूणी संघाचे मोठे योगदान आहे : जयसिंग वाघ 

0
17

भुसावळ :- बुध्दपूर्व काळात महिलांचे धार्मिक , सामाजिक जीवनातील स्थान नाममात्र होते , महिलांना प्रतिष्ठा नव्हती . गौतम बुद्ध यांनी भिक्खू संघाची स्थापना केली आणि महिलांना सुध्दा भिक्खूणी बनऊन स्वतंत्र भिक्खूणी संघ तयार केला त्यामुळे महिलांचे धार्मिक , सामाजिक , मानसिक , सार्वजनिक जीवन पार बदलून गेले . महिलांना प्रतिष्ठा मिळाली व महिलांनी सुध्दा विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.

सम्राट नगर , वरणगाव महिला मंडळ तर्फे बुद्ध विहारात दिनांक १२ मे रोजी बुद्ध जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यावक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.

जयसिंग वाघ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की, गौतम बुद्ध यांची मावशी असलेल्या गौतमी यांनी संघात प्रवेश मागितला तेंव्हा भगवान बुद्ध यांनी स्वतंत्र भिक्खूणी संघ तयार केला . गौतमी यांच्या नेतृत्वाखाली ५०० महिला एकाच दिवशी बौद्ध झाल्या . या महिलांनी विविध विषयांचा अभ्यास करून विविध विद्वानांना वादविवादात पराभूत करून आपली विद्वत्ता सिद्ध केली . विशाखा , खेमा , आम्रपाली , सुजाता सारख्या १०० पेक्षा अधिक भिख्खूणी अजरामर ठरल्या . पुढं सम्राट अशोक यांची मुलगी संघमित्रा भिक्खूणी होते , श्रीलंकेत जाते तिथं भाऊ महेंद्र सोबत बौद्ध धर्माचा प्रचार , प्रसार करते तिच्या कार्याने संपूर्ण श्रीलंका देश बौद्धमय होऊन जातो . आज जगभरात जो बौद्ध धर्म प्रस्थापित झालेला आहे त्यात भिक्खूणी संघाचे मोठे योगदान आहे असेही वाघ यांनी स्पष्ट केले व महिलांनी गौतमी ते संघमित्रा हा महिलांचा प्रवास आपला आदर्श मानून बौद्ध धर्माचे कार्य करावे असे आवाहन जयसिंग वाघ यांनी केले .

सुरवातीस भगवान गौतम बुद्ध , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर सामूहिक त्रीसरण , पंचशिल घेण्यात आली . कार्यक्रमाच्या शेवटी खीरदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी. जी. निकम होते त्यांनी गौतम बुद्ध यांच्यावर आधारित सुंदर गीत सादर केले मुख्य अतिथी प्रतिभा तावडे होत्या त्यांनी आजच्या परिस्थितीवर आधारित विचार मांडले व जगाला आता युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे असे सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता पवार , प्रास्ताविक जे. जी. सुरवाडे , स्वागत जे. जे. सोनवणे तसेच सर्व महिला वर्गाने केले तर आभारप्रदर्शन रितू जवरे यांनी केले . कार्यक्रमास बहुसंख्य स्त्री पुरुष पांढरेवस्त्र परिधान करून उपस्थित होते .

Spread the love