उमेदवारांना 90 लाखांची खर्च मर्यादा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

0
29

जळगाव -: राज्यात विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप निवडणूक आयोगाने जाहीर केली नसली तरी, जळगाव जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील अकरा मतदार संघातील मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात ३६ लाख ४६ हजार ८२४ मतदार आहेत.

त्यात पुरूष मतदार १८ लाख ७५ हजार ९१८ तर महिला मतदार १७ लाख ७० हजार ७६२ आहेत. तृतीयपंथी मतदार १४४ आहेत. यंदा निवडणुकीत उमेदवारांना ९० लाखापर्यंत खर्च करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यावेळी उपस्थित होते. निवडणुकीच्या प्रक्रियेची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील अकराही मतदारसंघांत मतदान यंत्राचे लवकरच वाटप होईल. मतदारसंघांत मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी त्या त्या मतदार संघाचे प्रमुख असतील. यंदा निवडणुकीत उमेदवारांना ९० लाखापर्यंत खर्च करता येईल. त्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते सुरू करावे लागेल. दहा हजार रूपये अनामत रक्कम अर्ज भरताना भरावी लागेल.

आरक्षित संवर्गासाठी पाच हजारांची अनामत रक्कम आहे. यंदा ‘२-ब’ नमुन्यात अर्ज उमेदवारास भरावा लागेल. उमेदवार राज्यात कोणत्याही मतदार संघात उभा राहू शकतो. मात्र सुचक व अनुमोदक त्या-त्या मतदार संघातील असावेत. त्यासाठी सुचक, अनुमोदकांना त्या मतदार संघातील मतदार यादीत त्यांचे नाव असल्याचा पुरावा द्यावा लागेल. जिल्ह्यात मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले आहेत. येत्या बुधवारी, गुरूवारी संबंधित मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या तयारीचा आढावा सादर करतील.

Spread the love