सिमेंट मिक्सर अन् इको कारची समोरासमोर धडक; ८ जनांचा मृत्यू

0
5

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे. रायते पुलावर सिमेंट मिक्सर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात इको कारमधील ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर उर्वरित प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही इको कार कल्याण ते मुरबाड या मार्गावर प्रवासी वाहतूक करत होती. पाच आसनांच्या या गाडीत १२ प्रवासी कोंबून भरले होते. ही गाडी सुसाट वेगाने मुरबाडच्या दिशेने जात होती. याचवेळी रायते पुलावर समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकची आणि इको कारची समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की संपूर्ण कारचा चक्काचूर झाला. यामुळे प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.

या अपघातावेळी मोठा आवाज झाला. तो ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर स्थानिकांनी मदतीसाठी हातभार लावला. या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस आणि महामार्ग प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करत गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. यानंतर या सर्वांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता यातील ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर उर्वरित प्रवाशी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या भीषण अपघातात मृतांमध्ये ५ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अद्याप यातील कोणाचीही ओळख पटलेली नसून, टिटवाळा पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या घटनेमुळे नियम धाब्यावर बसवून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता यावर काय ठोस उपाययोजना केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love