विधानसभा निवडणुकीच्या पराभवांवर मंथन करण्यासाठी काँग्रेसची बैठक घेण्यात अखेर जिल्हाध्यक्षांना वेळ मिळाला. सहा महिन्यांनी झालेल्या या बैठकीत वेगळ्याच विषयावरून वाद रंगला.
त्यामुळे बैठक आटोपती घ्यावी लागली. विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचे पानिपत झाले. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून या पक्षाला मिळालेल्या जागांवर फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याचे पडसाद आढावा बैठकीत उमटले. ही बैठक आरोप प्रत्यारोपांनी गाजली.
काँग्रेस पक्षाचे राज्याचे सहभागी बी. एम. संदीप यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीला मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे भाषण करण्याऐवजी सूचना कराव्यात असे जिल्हाध्यक्षांनी सांगितले. यावेळी अमळनेर मतदारसंघाचे पराभूत उमेदवार डॉ. अनिल शिंदे हे बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप केले. निवडणूक प्रचार आणि कालावधीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे कोणतेही सहकार्य मिळाले नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
आपल्याला मानसिक वार्षिक त्रास देण्यात आला. पक्षाच्या आलेल्या निधीतून जिल्हाध्यक्ष पवार यांनी दोन लाख रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपानंतर उमेदवारी शिंदे आणि जिल्हा अध्यक्ष पवार यांचे समर्थक चांगलेच संतापले. झालेल्या या समर्थकांनी एकमेकांवर धावून जात वाद घालण्यास सुरुवात केली.
याच वेळी भुसावळ येथील पराभूत उमेदवार राजेश मानवतकर यांनीही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले. चांगला आहे मात्र पक्षातील काही पदाधिकारी वाईट आहेत. त्यांच्याकडून पक्षाच्या कामासाठी काहीही मदत मिळत नाही. त्यांचा पक्षाने समाचार घ्यावा असे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे आणि उपाय योजना यासाठी बैठकीत चर्चा होणे अपेक्षित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी (jSN) हा मुख्य विषय होता. यावेळी झालेल्या गोंधळामुळे बैठकच आटोपती घ्यावी लागली. माजी आमदार शिरीष चौधरी, प्रतिभा शिंदे, ॲड संदीप पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष पवार यांनी पराभूत उमेदवार डॉ. शिंदे यांच्या आरोपांचे खंडन केले. डॉ. शिंदे हे पक्षाचे सदस्य नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्याशी आपले कोणतेही संभाषण देखील झालेले नाही. त्यांना ऐनवेळी उमेदवार देऊन चूक झाली असे ते म्हणाले.