मुंबई – :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.
मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या या दौऱ्यासाठी निघणार आहेत. एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत एक दिवस मुक्काम असेल. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. त्यानंतर ते दिल्लीहून थेट पुण्याला येतील. पुण्याहून मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार आहेत. तेथे त्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त विठ्ठलाची पूजा होईल. तेथून ते मुंबईला परतील, अशी माहिती मिळाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला सुरूवात केली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतु, आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. मुख्यमंत्री मंत्रालयातील दालनात येणार म्हणून आज आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यानंतर रितसर पूजा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कामकाजास सुरुवात केली.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळातील पहिल्याच भाषणात एकनाथ शिंदे यांनी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले होते. पहाडासारखे आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असे अमित शाह यांनी सांगितल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले होते. त्यानंतर आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांना भेटणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.