मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना थेट इशारा, ‘ही’ चूक केली तर निलंबन नाही तर थेट बडतर्फ

0
94

मुंबई :- राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विविध मुद्द्यांवर सविस्तर निवेदन मांडत आहेत. ते विरोधकांच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत.

तसेच ते विविध प्रश्नांवर भूमिका मांडत आहेत. राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांवरही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माहिती दिली. राज्यातील गुन्हेगारी ही गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेसहा टक्क्यांनी घटल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच नागपुरात अकरा टक्क्यांनी गुन्हेगारी घटल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ड्रग्जच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली. या विरोधात कठोर कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना देखील मोठा इशारा दिला. तसेच आतापर्यंत 13 पोलिसांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात दिली.

“अंमली पदार्थांसंदर्भात मी लक्षवेधीमध्ये देखील माहिती दिली आहे. 2024 च्या मे महिन्याच्या अखेरीस 1568 आरोपींना अटक केली होती. तर 2025 च्या मे महिन्याच्या अखेरीस 2194 आरोपींना अटक केली आहे. आता प्रत्येक पोलीस ठाण्याला आपण नार्कोटिस्कचा वेगळा सेल तयार केलेला आहे. त्यामध्ये 5 हजार 975 अंमलदार आणि 1974 पोलीस अधिकारी हे स्पेशली नार्कोटिस्क सेलकरता काम करत आहेत. आपल्यासमोर पुढच्या काळात नार्कोटिस्क हे खूप मोठं आव्हान निर्माण झालं आहे. त्यावर कारवाई करण्याकरता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्तरावर आपण ही कारवाई केली आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“यापूर्वी नार्कोटिस्कमध्ये तीच ती मंडळी वारंवार गुन्हा करायची. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी कोणताही प्रतिबंधात्मक कायदा नव्हता. याच अधिवेशनात दोन्ही सभागृहांनी मकोका लावायची परवानगी दिली आहे. आपण कायद्यात तो बदल केलेला आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या केसेसमध्ये आता मकोका लावता येईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“आपण एक निर्णय घेतला होता की, जे पोलीस अशा प्रकारच्या कारवाईत आरोपी आढळतील, त्यांना निलंबित नाही तर बडतर्फ करायचं. या माध्यमाच्या कारवाईतून आतापर्यंत 13 पोलिसांना बडतर्फ केलेलं आहे. कुठल्याही स्तरावरचा असू द्या. तो अधिकारी असो किंवा अंमलदार असो, जो ड्रग्सच्या केसमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आरोपींसोबत सहभागी असेल तर त्याला निलंबित केलं जाणार नाही तर बडतर्फच केलं जाईल”, असा मोठा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिला.

Spread the love