‘अंगात रक्ताचा थेंब असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहणार’; मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं आश्वासन

0
15

जळगाव : ‘आगामी विधानसभा निवडणुकीत तुमचे आशीर्वाद राहू द्यावे.

जळगाव – अंगात रक्ताचा थेंब असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहील. येत्या १७ ऑगस्टला दोन महिन्यांचे तीन हजार रुपये प्रत्येक बहिणीच्या खात्यात नक्की पडतील,’ असा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

जळगाव येथील सागर पार्क मैदानावर आज महिला सशक्तीकरण अभियानात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडा व युवक मंत्री रक्षा खडसे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेला महिलांचा अफाट प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांचे पोट दुखू लागले आहे. महायुतीचे सरकार महिलांचे सक्षमीकरण करणारे, शेतकरी, महिला, युवा आदी सर्वांना देणारे सरकार आहे. विरोधक आता आमच्या योजनांचा अपप्रचार करीत आहे. ही योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणली आहे.

या योजनेचे पैसे परत घेतले जातील, महिलांना विकत घेण्याचे काम सरकार करते आहे, ही योजना नंतर बंद होईल अशा अफवांचे पीक विरोधक पसरवीत आहे. बहिणींनो अशा भूलथापांना बळी पडू नका. अशा ‘सावत्र भावा’पासून सावध राहा. हा भाऊ (मुख्यमंत्री) व मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही महायुतीला विधानसभा निवडणुकीत साथ द्या, तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही.

विरोधकांकडून दिशाभूल : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ”सर्वसामान्य कुटुंबातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही योजना केलेली नाही. गेल्या आठ महिन्यांपासून या योजनेवर काम सुरू होते. राज्यातील विकासकामांना या योजनेमुळे खीळ बसणार नाही. या योजनेसाठी स्वतंत्र निधी आहे. राज्याला जो ‘जीएसटी’ मिळतो त्यातील हा निधी आहे. विरोधक अफवा पसरवीत आहेत.” लोकसभेतही आरक्षण बंद होईल अशी अफवा पसरविली. आरक्षण बंद झाले नाही. या योजनेचे पैसे परत घेणार नाही. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.

‘ही भाऊबिजेची ओवाळणी’ 

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ”विरोधक कितीही आमच्याविषयी खोटे बोलू द्यात, बहिणीचे सुरक्षाकवच आम्हाला आहे. आमचे कोणी वाकडे करू शकत नाही. दर महिना पंधराशे रुपये राज्यातील महिलांना देऊन भाऊबिजेची ओवाळणी देत आहे. बहिणींच्या प्रेमातून उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे. बहिणींनो, सावत्र भावांच्या (मविआच्या) भूलथापांना बळी पडू नका.

Spread the love