मुंबई : शिवसेनेत माजलेला बंडाळी नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोड्या वेळातच राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे ३५ पेक्षा जास्त आमदार असून ते परतले नाही तर सरकारच अल्पमतात येणार आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री सरकार बरखास्तीची शिफारसही करू शकतात. त्यामुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदारांची गोळाबेरीज केली आहे. मात्र, ५५ पैकी सुमारे ३५ आमदार भाजपच्या गळाला लागल्याचे स्पष्ट झाले आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांचे मन वळविण्याचे प्रयत्नही अपयशी ठरले आहेत. त्यामुळे अल्पमतात असलेले सरकार कोणत्या क्षणी पडू शकते. त्यामुळे त्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता आहे.
ज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला तर राज्यपालांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. राज्यपाल लगेच राष्ट्रपती राजवट लागू करण्यापेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात. अशावेळी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असलेला आमदारांचा गट त्यांना समर्थन देण्याची शक्यता आहे.